BJP Criticizes Maharashtra Government: भाजप आक्रमक! जळगावमधील एस.टी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर, गिरीश महाजन यांची महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका
Devendra Fadnavis, Atul Bhatkhalkar, Girish Mahajan (Photo Credit: PTI and facebook)

दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्याने जळगावमधील एका एस.टी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मृत व्यक्तीने चिठ्ठी लिहली असून त्यात एसटी महामंडळातील कार्यपरद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (Maharashtra Government) हेच त्याच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर भाजपने (BJP) महाराष्ट्र सरकार विरोधात आक्रमक भुमिका घेतल्याचे दिसत आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

कोरोना संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. दिवाळीचा सण तोंडावर असताना एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यातच आर्थिक अडचणींमुळे जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहणाऱ्या एसटी कर्मचारी मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोज चौधरीच्या आत्महत्येमुळे जळगाव शहरात आणि एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. या धक्कादायक घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र: एसटी कर्मचा-यांना अखेर मिळाला न्याय! प्रलंबित वेतनापैकी तासाभरात 1 महिन्याचा तर दिवाळीपूर्वी 2 महिन्याचा पगार देणार, अनिल परब यांची घोषणा

"वेतन न मिळाल्याने 2 एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या,या अतिशय वेदनादायी,मनाला अस्वस्थ करणार्‍या घटना आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही 2 कुटुंब उघड्यावर आली आहेत. आता तरी सरकारने जागे व्हावे. एसटी कर्मचार्‍यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार? या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का?" असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला विचारला आहे.

"जर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीची अटक होऊ शकते. तर एस टी चे वाहक मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी बेशरम ठाकरे सरकार परिवहनमंत्री अनिल परब यांना का अटक करत नाही? मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाही जबाबदार धरावे", असे भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

"महाराष्ट्र सरकार गेंड्याच्या कातडीचे असून कुठल्या सवंदेना या सरकारला नाहीत. एकीकडे दिवाळीचा सण तोंडावर आला असताना 4-4 महिने तुम्ही लोकांना पगार देत नाहीत. शेतकऱ्यांना सांगितले की दिवाळी गोड करू, त्यांनाही कुणी एक रुपया द्यायला तयार नाही", असे भाजप आमदार गिरीश महाजन म्हणाले आहेत.