महाराष्ट्र: एसटी कर्मचा-यांना अखेर मिळाला न्याय! प्रलंबित वेतनापैकी तासाभरात 1 महिन्याचा तर दिवाळीपूर्वी 2 महिन्याचा पगार देणार, अनिल परब यांची घोषणा
Anil Parab and ST Bus (Photo Credits: PTI)

डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाच्या (MSRTC) दयनीय अवस्थेमुळे येथील कर्मचा-यांचे वेतन (ST Staff Salary) थकबाकी होती. येथील कर्मचा-यांना मागील 2-3 महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. म्हणून एसटी कर्मचा-यांनी आज आक्रोश आंदोलन केले होते. त्यात आज सकाळपासून जळगाव आणि रत्नागिरीतील एसटी कर्मचारी आणि एसटी चालकाने आत्महत्या केल्याचे समोर आले. यास सर्वाचा विचार करुन राज्य परिवहन मंडळाकडून आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचा-यांना प्रलंबित पगारापैकी आज 1 महिन्याचा तर दिवाळीपूर्वी 2 महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली आहे.

या निर्णयाने एसटी कर्मचा-यांचा जीव भांड्यात पडला असून त्यांची दिवाळी चांगली जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येच्या घटना ऐकून त्यांना असे काही एक करण्याची गरज नसून असा टोकाचा निर्णय घेऊ नका असे अनिल परब यांनी सांगितले आहे. राज्यावर आर्थिक संकट असून आम्ही यातून कसे बाहेर पडता येईल याचा मार्ग काढत आहोत असेही ते म्हणाले. हेदेखील वाचा- महाराष्ट्र: वेतन थकल्यामुळे रत्नागिरी आणि जळगाव मध्ये एसटी कर्मचा-याची आत्महत्या

दरम्यान जळगावच्या एका बस कंडक्टरने वेतन न मिळाल्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्याने सुसाईड नोट मध्ये ठाकरे सरकारला जबाबदार धरले आहे.