शरद पवार (PC - ANI)

गेल्या आठवड्यापासून दिल्लीमध्ये हिंसाचाराचे सत्र सुरू आहे. या हिंसाचारावरून राजकीय नेते एकमेकांवर खापर फोडताना दिसत आहेत. अशातचं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी दिल्ली हिंसाचारावरून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रातील भाजप सरकार (BJP Government)

जबाबदार असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सत्ता मिळवता न आल्याने भाजप समाजात तेढ निर्माण करत असल्याचंही पवारांनी म्हटलंय. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरामध्ये शरद पवारांनी केंद्रातील भाजप सरकारवर टिकास्त्र सोडलं.

दिल्लीमध्ये हिंसाचार झाला त्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते. त्यावेळी देशाची राजधानी जळत होती. जर राज्यकर्त्यांनीचं दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर देशाचं भवितव्य अवघड होईल. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्राची आहे. त्यामुळे दिल्लीत जे काही घडलं त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे, असं स्पष्ट मतही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. (हेही वाचा - शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित महापालिकेची निवडणूक लढणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत)

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पुढील विधानसभा निवडणुकांतमध्येही शिवसेनेसोबत आघाडी करणार असल्याचे सांगितले. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.