Jayant Patil on BJP: अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव म्हणजे भाजपची वैचारिक दिवाळखोरी- जयंत पाटील
Jayant Patil | (Photo Credits: twitter)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची सीबीआय (CBI) चौकशी करावी  अशी मागणी करत तसा ठराव महाराष्ट्र भाजप (BJP) कार्यकारिणीत करण्यात आला. या ठरावावरुन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडले आहे. एका अटक झालेल्या अधिकाऱ्याने पत्र लिहून वाटेल तसे बेछूट आरोप केले आहेत. जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यासारखा गंभीर आरोप असलेल्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर भाजप कार्यकारिणी जर एखादा ठराव करत असेल तर भाजप पक्षात वैचारिक दिवाळखोरी आली असल्याचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र भाजप कार्यकारणीच्या आज (24 जून) पार पडलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले. यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे पत्र आणि सचिन वाझे प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्याबाबत एक ठराव संमत करण्यात आला. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणात आता अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी करण्यात यावी अशी भूमिका भाजपने घेतली आहे. भाजप कार्यकारीणी बैठकीवेळी चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासाघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. (हेही वाचा, Devendra Fadnavis On MVA Government: राज्य सरकारच्या विविध विभागांतील वाझेंचा पत्ता आमच्याकडे- देवेंद्र फडणवीस)

एनसीपी ट्विट

भाजपच्या या ठरावावरुन बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली गाडी उभी करण्याबाबतच्या आणि त्याच्याशी संबंधीत इतरही काही प्रकरणांचा तपास केंद्रीय यंत्रणा (NIA) करत आहे. हा तपास सुरु असताना आरोपींकडून पत्रं दबावाखाली लिहून घेण्यात आली असावी, अशी आम्हाला खात्री आहे. राज्यातील जनताही दूधखूळी राहिली नाही. पत्रांमध्ये जे उल्लेख पाहालया मिळत आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत. इतका तपास करुनही हाती काहीच लागत नसल्याने आता असे ठराव आणि विविध प्रकारचे आरोप करण्यात येत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.