'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी', हे वादग्रस्त पुस्तक अखेर मागे घेणार: भाजप
Jai Bhagwan Goyal | (Photo Credits: Facebook)

'आजके शिवाजी, नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे काल भाजपच्या दिल्ली कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. परंतु, या पुस्तकात पंतप्रधान मोदी यांची शिवरायांशी केलेली तुलना ही अनेकांना खटकली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अँड शिवसेना या तिन्ही पक्षांनी या पुस्तकावर निषेध व्यक्त केला. आज दिवसभर राज्यभरात अनेक नागरिकांनी या पुस्तकाला विरोध दर्शवत आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडने या सांघटनेने तर भाजपला हे पुस्तक मागे घेण्याची धमकीच दिली. अखेर हे पुस्तक मागे घेण्याचा विचार करण्यात येईल असं भाजपच्याच नेत्यांनी सांगितलं आहे.

भाजप महाराष्ट्र या ट्विटर हॅण्डलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, भाजप कार्यकर्ते संजय मयूख यांनी म्हटले आहे की, "'आजके शिवाजी, नरेंद्र मोदी' हे पुस्तक एका व्यक्तीने लिहिले आहे, आणि ते त्यांचं लेखन आहे. हे पक्षाचे प्रकाशन नाही. आमचा या पुस्तकाशी काही संबंध नाही. हे पुस्तकाच्या लेखकांनी देखील सांगितले आहे. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही हे पुस्तक मागे घेत आहोत."

तसेच भाजप नेते श्याम जाजू यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितलं की प्रकाशकांना हे पुस्तक मागे घेण्यास सांगण्यात आले आहे.

विरोधी पक्षांनी या पुस्तकावर घेतलेल्या आक्षेपाबद्दल बोलताना, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्या आरोपांना उत्तर दिलं आहे. "जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना होऊच शकत नाही. नरेंद्र मोदी सुद्धा अशी तुलना करणार नाहीत. मात्र विरोधक राईचा पर्वत करत आहेत," असा आरोप त्यांनी केला.