Sharad Pawar | (Photo Credits-Twitter)

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे (Bihar Assembly Election 2020) निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये एनडीए (NDA) आघाडीवर असून, आज रात्री उशिरा संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, बिहारमधील निवडणुकीचा निकाल हा कोणता बदल घेऊन आला नसला तरी, त्यामुळे भविष्यात परिवर्तनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शरद पवार पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांचे तोंडभरून कौतुक केले.

ते म्हणाले, ‘प्रचारादरम्यान मी जे पाहिले त्यामध्ये एकीकडे नरेंद्र मोदी होते, जे अनेक वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत व सध्या दुसऱ्यांदा पंतप्रधान आहेत. यांच्यासोबत सध्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार होते. दुसरीकडे तेजस्वी यादव सारखा अननुभवी तरुण होता. तेजस्वीने ज्या प्रकारे निवडणुका लढल्या त्या अनेक तरुणांना प्रेरणा देतील. आजचे निकाल कदाचित बदल घडवून आणणारे नसतील, मात्र त्यामुळे भविष्यात बदल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ‘

यासह बिहारमध्ये निवडणूक न लढवण्याचे कारणही पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘तेजस्वी यादव यांना जितके मोकळे हात मिळतील तेवढे चांगले असे मत होते, त्यामुळे तिथे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता.’ याआधी गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काही जागा लढवल्या होत्या, ज्या काही मतांच्या फरकाने पडल्या. पण त्यामुळे काँग्रेसची मते विभागली गेली. परिणामी गुजरातमध्ये भाजप विजयी झाले. बिहारमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवली असती तर काँग्रेसची मते कदाचित विभागली असती.

मंगळवारी पहाटे मतमोजणी सुरू होताच महागठबंधनने काही प्रमाणात मतांचा फायदा मिळविला पण लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ही जागा घेऊन ते आघाडीवर राहिले. एनडीएकडे घटकपक्ष म्हणून भाजपा, जनता दल आणि इतर पक्ष आहेत, तर महागठबंधनचे नेतृत्व कॉंग्रेस व तीन डाव्या पक्षांसह आरजेडी करीत आहे. (हेही वाचा: Bihar Election 2020: बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार? पाहा काय म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत)

बिहारमध्ये भाजपला देवेंद्र फडणवीसांमुळे फायदा झाला असे म्हटले जाते, तुमचे  मत काय आहे असा प्रश्न विचारल्यावर पवार आपल्या खास शैलीत म्हणाले,  देवेंद्र फडणवीसांमुळे चमत्कार झाला हा प्रकाश तुमच्यामुळे आमच्या डोक्यात पडला. दरम्यान, या निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय होत असताना दिसत आहे. त्यांनी 110 जागांपैकी 74 जागा जिंकल्या आहेत (संध्याकाळी 6 पर्यंत). दरम्यान यंदा ईव्हीएमची संख्या वाढल्याने या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास वेळ लागणार आहे.