Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणूक आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती
Naval Kishore Ram | (Photo Credit: YouTube)

पुण्याचे जिल्हाधिकारी (Pune District Collector) नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांची पंतप्रधान कार्यालयात (Prime Minister's Office) नियुक्ती झाली. पंतप्रधान कार्यालयात आता ते उपसचिव या पदावर कार्यरत राहणार आहेत. त्यांची ही नियुक्ती पुढील तीन ते चार वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत असणार आहे. कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली किंवा नियुक्ती ही पूर्णपणे प्रशासकीय आणि प्रशासकीय कामाचा भाग असते. परंतू, त्याला राजकीय संदर्भ नसतातच असेही नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन रंगणारे राजकारण पाहता बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. दरम्यान, नवल किशोर राम यांच्या नियुक्तीलाही राजकीय वर्तुळात वेगळ्या अर्थाने पाहिले जात आहे. या बदलीचा अथवा नियुक्तीचा संदर्भ थेट आगामी काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) सोबत लावला जातो आहे.

नवल किशोर राम हे सन 2008 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. आयएएस झाल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती ही नांदेड येथे झाली. नांदेडमध्ये काम केल्यानंतर त्यांन यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्षे काम पाहिले. त्यानंतर त्यांनी बीड आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आणि आता गेली दोन वर्षे ते पुणे येथे कार्यरत आहेत. म्हणजेच नवल किशोर राम यांनी आपल्या एकूण प्रशासकीय सेवेतील बहुतांश वर्षे ही महाराष्ट्रात सेवा दिली आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना फेम इंडिया - आशिया पोस्ट मिळाली. देशातील 50 सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांपैकी झालेल्या सर्व्हेक्षणातून (2020) त्यांना ही पोस्ट मिळाली. पुणे जिल्ह्यात सेवा बजावलेल्या अनेक अधिकाऱ्यांना पुढे पंतप्रधान कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, नवल किशोर राम यांच्या नियुक्तीबाबत मात्र वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

नवल किशोर राम यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख आहे. असे असले तरी त्यांची आणखीही एक ओळख आहे. ज्याला राजकीय वर्तुळात अधिक महत्त्व आहे. नवल किशोर राम हे माजी काँग्रेस नेते दिवंगत बाबू जगजीवनराम यांच्या कन्या आणि माजी लोकसभा सभापती मीरा कुमार यांचे भाचे असल्याचे सांगितले जाते. जगजीवनराम हे बिहारचे आणि काँग्रेसचे मोठे नेते. मीरा कुमार याही काँग्रेसच्या मोठ्या नेत्या आहेत. दरम्यान, गेल्या काही काळात जगजीवनराम आणि मीरा कुमार यांच्या परिवारास बिहारच्या राजकीय परीघात फारसे स्थान व्यापता आले नाही. मात्र, या परीवाराने प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमठवला आहे. मीरा कुमार या देखील लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. (हेही वाचा, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती)

दरम्यान, आगामी काळात बिहार राज्यात एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशिल आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान कार्यालयातून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घोषणा झाल्यास त्यात बिहारच्या या भूमिपूत्राचा (नवल किशोर राम) यांची भूमिका महत्त्वाची ठरु शकते. त्यामुळे राजकीय वर्तुळातून नवल किशोर राम यांच्या पंतप्रधान कार्यालयातील नियुक्तीला राजकीय अर्थानेच पाहिले जाऊ लागले आहे. अर्थात राजकारणात गोष्टी थेट होत असल्या तरी थेट दाखवल्या मात्र जात नाहीत. त्यामुळे या नियुक्तीचे कंगोरो नेमके काय आहेत याबाबत येणारा काळच काही सांगू शकेल.