Puja Khedkar (PC - X/@Rajen_Bansal)

Puja Khedkar Fake Identity Case: निलंबित IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (IAS Trainee Pooja Khedkar) यांना गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाकडून (Delhi High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने पूजाच्या अटकेपासून अंतरिम संरक्षणाची (Interim Protection) मुदत 4 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा लाभ घेतल्याच्या आरोपाखाली पूजाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांनी पूजाच्या वकिलाने केलेल्या विनंतीनंतर अटकपूर्व जामीन मागणाऱ्या पूजाच्या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली. दरम्यान, दिल्ली पोलिसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला माहिती दिली की, तपासात या प्रकरणाशी संबंधित मोठे कट उघड होत आहे. 12 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने यापूर्वी दिल्ली पोलिसांना माजी IAS पूजा खेडकर यांना 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते.

पुढील सुनावणीपर्यंत अटकेवर बंदी -

न्यायमूर्ती चंद्र धारी यांनी सांगितले की, याचिकाकर्त्याच्या वकिलाने केलेल्या विनंतीनंतर आता या प्रकरणावर 4 ऑक्टोबरला सूनावणी घेण्यात येईल. तोपर्यंत कारवाईचा अंतरिम आदेश सुरू राहील. पूजा खेडकर हिच्यावर 2022 च्या UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी OBC आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तिच्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, पूजाने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (हेही वाचा - Pooja Khedkar Case: पूजा खेडकर हिमनगाचे टोक; अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी रॅकेट; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, UPSC आणि दिल्ली पोलिसांनी पूजाची अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे. खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर गेल्या महिन्यात 12 ऑगस्ट रोजी नोटीस बजावताना उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते आणि वेळोवेळी त्यात वाढ करण्यात आली होती. (हेही वाचा - Delhi HC on Puja Khedkar Case: 'पूजा खेडकर तिची उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला 'योग्य मंचा'समोर आव्हान देऊ शकते'; उच्च न्यायालयाचा निर्णय)

पूजा खेडकरला कोणत्याही प्रकारचा दिलासा दिल्याने खोल कटाच्या तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो, असा दावा दिल्ली पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणाचा लोकांच्या आत्मविश्वासावर तसेच नागरी सेवा परीक्षेच्या अखंडतेवर मोठा परिणाम होईल. ही बाब उघडकीस आल्यानंतर, UPSC ने जुलैमध्ये पूजा खेडकर विरुद्ध कारवाई सुरू केली होती, ज्यामध्ये तिची ओळख खोटी सांगून नागरी सेवा परीक्षेत बसल्याबद्दल तिच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहितेसह इतर अनेक तरतुदींखाली एफआयआर नोंदवला आहे.