Bhiwandi Municipal Corporation| | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

Bhiwandi Municipal Mayor Election: नरेंद्र मोदी आणि भाजपची हवा असतानाही भिवंडी महापालिका (Bhiwandi Municipal Corporation) निवडणुकीत काँग्रेसच्या हाताची ताकद कायम दिसली. काँग्रेसने भिवंडी महापालिकेवर एकहाती झेंडा फडकवला. पण, मधल्या काळात राजकारण असे काही फिरले की, सर्वाधिक 47 नगरसेवक असतानाही महापौर निवडणूकीत (Bhiwandi Municipal Mayor Election 2019) केवळ चार नगरसेवक इतकेच संख्याबळ असलेल्या कोणार्क विकास आघाडी (Konark Vikas Aghadi) नगरसेविका प्रतिभा पाटील (Pratibha Patil) थेट महापौर म्हणून निवडूण आल्या. भिवंडी महापालिकेत सर्वाधिक शक्तिमान असलेल्या काँग्रेसला फुटीचे आणि बंडखोरीचे ग्रहण लागले आणि ही किमया घडली. केवळ बंडखोरीमुळे काँग्रेसला भिवंडी महापालिकेतील आपले महापौर पद गमवावे लागले आहे.

चार नगरसेवक तरीही थेट महापौर पद

भिवंडी महापौर निवडणूक निकालावर नजर टाकता कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील यांना एकूण 49 मतं मिळाली. तर, काँग्रेस पक्षाच्या रिषिका राका यांना 41 मतं मिळाली. काँग्रेसने एकगठ्ठा मतदान केले असते तर काँग्रेसचा उमेदवार सहज निवडूण आला असता. पण, काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटले आणि पक्षाला हादरा बसला. त्याची परिणीती पक्षाचा महापौर पदाचा उमेदवार पराभूत होण्यात झाली.

काँग्रेसच्या गडाला सुरुंग

काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी कोणार्क विकास आघाडी गेले अनेक दिवस प्रयत्नशिल होती. पण, त्यास यश येत नव्हते. अखेर या वेळी महापौर पदाच्या निवडणुकीत त्याला यश आले. काँग्रेस, कोणार्क विकास आघाडी, शिवसेना या पक्षाच्या वतीने अनुक्रमे रिषिका राका, प्रतिभा पाटील, वंदना मनोज काटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

व्हीपलाही जुमानले नाहीत काँग्रेस बंडखोर

काँग्रेसने आपल्या नगरसेवाकांना उमेदवार रिषिका राका यांना मतदान करण्यासाठी व्हीपही बजावला होता. मात्र, एकाच वेळी 18 नगरसेवकांनी बंड केले. त्यामुळे काँग्रेस बंडखोर व्हीपलाही जुमानले नाही, असे बोलले जात आहे. बंडखोर नगरसेवकांनी कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांच्या बाजून मतदान केले. (हेही वाचा, मुंबई: महापालिकेत 341 इंजिनियरिंग पदाची भरती, संपूर्ण माहिती घ्या जाणून)

भिवंडी महापालिका पक्षीय बलाबल

काँग्रेस 47
शिवसेना 12
भाजप 20
कोणार्क विकास आघाडी 04
समाजवादी पार्टी 2
आरपीआय (एकतावादी) 4
अपक्ष 1

दरम्यान, महापौर पदाच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी काँग्रेसला उपमहापौर पदच्या निवडणुकीत मात्र यश मिळाले आहे. उपमहापौर पदावर काँग्रेसचे बंडखोर इमरानवल्ली यांची निवड झाली आहे. इमरानवल्ली यांनी एकूण 49 मतं मिळवत शिवसेनेच्या बालाराम मधुकर चौधरी यांना पराभूत केले. बालाराम चौधरी यांना 41 मतं मिळाली.