महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आपल्या मूळ भूमिकेपासून हरवले आहेत. आज आपल्याला जे राज ठाकरे दिसत आहेत ते केवळ बनावट आहेत, अशी तीव्र टीका भीम आर्मीचे (Bhim Army) राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे (Ashok Kamble) यांनी केली आहे. तरुणांचे प्रश्न, वाढती बेकारी, मगाहाई, केंद्र सरकारचे दिशाहीन धोरण अशा विषयांवर स्पष्टपणे भूमिका मांडणारे राज ठाकरे हे खरे राज ठाकरे आहेत. खऱ्या राज ठाकरे यांची भीम आर्मीही आदर करते. मात्र, राज ठाकरे यांनी आपली वास्तवता सोडून आता मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतली आहे. ज्याच्यातून सामाजिक तेढ निर्माण होऊन वातावरण गडूळ होईल. राज ठाकरे यांच्या या भूमिकेला भीम आर्मी तीव्र विरोध करेन, असेही अशोक कांबळे यांनी 'लेटेस्टली मराठी'च्या प्रतिनिथीशी बोलताना स्पष्ट केले.
औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या संभाव्य सभेला भीम आर्मी तीव्र विरोध करत आहे. राज ठाकरे यांनी मुंबई येथील शिवाजी पार्क आणि ठाणे येथील सभांतून अत्यंत प्रक्षोभक वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्याच्या दृष्टीने त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये. पोलिसांनी जरी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली तरी भीम आर्मी ही सभा उधळून लावेल, असा इशाराही अशोक कांबळे यांनी या वेळी दिला. (हेही वाचा, Mahaparinirvan Din: दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे; स्थानकाबाहेर भीम आर्मीचे आंदोलन)
अशोक कांबळे यांनी पुढे बोलताना सांगितले की, राज ठाकरे यांना खरोखरच मशिदींवरील भोंग्याचा त्रास होत असेल तर त्यांनी न्यायालयाकडे जावे. सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांबाबत जी मार्गदर्शक तत्वे अथवा अटी घालून दिल्या आहे त्या पाळण्यास राज्य सरकार आणि सर्वच जण तयार आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांकडे बोट दाखवत राज ठाकरे भोंग्यांबाबत जी भूमिका घेत आहेत ती भलतीच आहे. मशिदींवरील भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे नियम राज्य सरकार पाळत नाहीत, असे राज ठाकरे यांना वाटत असेल तर त्यांनी कायदेशीर लढा द्यावा. राज्य सरकारच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करावी. तसेच, राज्य सरकार हे भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळत नाही असे न्यायालयाला पटवून द्यावे. तसे करण्या ऐवजी त्यांनी थेट कायदा हातात घेण्याची भाषा केली आहे. त्यामुळे भीम आर्मी त्यांच्या भूमिकेला विरोध करत असल्याचेही अशोक कांबळे म्हणाले.