Bhaskar Jadhav Appeal, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावानंतर सभागृहात बोलताना शिवसेना (Shiv Sena) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि सत्ताधारी गटाला जोरदार धारेवर धरले. या वेळी भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आवाहन केले. एकनाथ शिंदे पुन्हा विचार करा. शिवसेना संपवणे हाच यांचा एककलमी कार्यक्रम आहे. यामध्ये नुकसान होणार आहे ते केवळ शिवसेनेचेच. त्यामुळे विचार करा शिवसेना वाचविण्यासाठी दोन पावले मागे या असे अवाहनही भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांनी केले.

विधानसभेत भास्कर जाधव यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. भास्कर जाधव यांनी सभागृहात भाजपने आयात केलेल्या सदस्यांची थेट यादीच वाचून दाखवली. ही यादी वाचून दाखवत जाधव यांनी म्हटले की, कृपया समजून घ्या. कोण कोणाविरुद्ध लढत आहे ते पाहा. लढाईमध्ये ज्याला कोठे आणि कधी थांबायचे तोच खरा योद्धा असतो. त्यामुळे लढाई समजून घ्या. या लढाईत संपेल ती शिवसेना, शिवसैनिक. त्यामुळे समजून घ्या. नीट विचार करा, असे आवाहनच भास्कर जाधव यांनी शिंदे यांना केले. (हेही वाचा, Sanjay Raut On CM Eknath Shinde: 'आम्ही पुन्हा निवडून येऊ, भाजप आणि शिंदे गटाची युती तात्पुरती व्यवस्था'; संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा)

भास्कर जाधव यांनी पुढे म्हटले की, एका बाजूला आपल्याकडे 40 आमदार आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना वाचविण्याचा प्रयत्न करणारे शिवसैनिक छातीचा कोट करुन उभे आहेत. दोन्हीपैकी तुम्ही काय स्वीकाराल, असा प्रश्न जाधव यांनी शिंदे यांना विचारला. आपल्या कृतीमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारताची पुनरावृत्ती होईल. सख्खे, चुलत भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे मविआचे सरकार पहिल्या दिवशी स्थापन जाले तेव्हापासून त्यांचे प्रत्येक चाल, प्रत्येक कृती ही सरकार उलथून लावण्यासाठीच होते, असा आरोपही भास्कर जाधव यांनी या वेळी केला.