मुंबई मध्ये बेस्ट(BEST) कडून आता त्यांच्या अॅप बेस्ड बस सर्व्हिस मध्ये 'Home Reach' हे नवं फीचर अॅड केले जाणार आहे. या 'Home Reach' फीचरमुळे महिला प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी सुविधा दिली जाणार आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, 'Home Reach'ही सेवा बेस्टच्या प्रिमियम आणि लक्झरी बस चालवणार्यांसाठी असणार आहे. या फीचर करिता प्रवाशांना त्यांची खाजगी माहिती शेअर करावी लागणार आहे त्यामध्ये घराचा पत्ता, इमरजंसी कॉन्टॅक्ट नंबर यांचा समावेश असणार आहे.
प्रवाशांना यामध्ये त्याचं लाईव्ह लोकेशन देखील शेअर करण्याचा पर्याय मिळणार आहे. या लाईव्ह लोकेशन द्वारा बेस्टची कंट्रोल रूम प्रवासी घरी सुरक्षित पोहचली की नाही हे पाहणार आहे. एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, जर महिला इच्छितस्थळी वेळेत पोहचली नाही तर तिला कंट्रोल रूम कडून फोन करून त्याबद्दल विचारलं जाईल. त्यांचा फोन लागला नाही तर इमरजन्सी कॉन्टॅक्ट नंबरवर विचारणा केली जाईल. विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे फीचर महत्त्वाचं असल्याचंही त्या अधिकार्याने सांगितलं आहे. हे देखील नक्की वाचा: BEST आता 100% इलेक्ट्रिक; 'चलो ॲप' किंवा 'चलो बसकार्ड' द्वारे प्रवाशांना मिळणार डिजीटल सेवा; आदित्य ठाकरे यांची घोषणा .
बेस्ट सुरूवातीच्या टप्प्यामध्ये 30 प्रिमियम बसेस सुरू करण्याच्या विचारात आहे. ही सुविधा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि दक्षिण मुंबईच्या भागात सुरू होईल. सामान्य बेस्ट बसच्या दरापेक्षा या प्रिमियम आणि लक्झरी बससेवेचे दर थोडे अधिक असतील. या वर्षाअखेरीस या बसची संख्या 100 करण्याचा त्यांचा मानस आहे.