
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) अॅप-आधारित बस ऑपरेटर आणि एग्रीगेटर कॅब यांच्याशी थेट स्पर्धेसाठी सज्ज होत असल्याचे दिसत आहे. आता बेस्टचा मुंबईकरांच्या सेवेमध्ये लक्झरी बसेस (Luxury Buses) दाखल करण्याचा मानस आहे. सार्वजनिक वाहतूकदार ‘बेस्ट’ मुंबईमध्ये मर्सिडीज-बेंझ, स्कॅनिया आणि व्होल्वो यांच्या लक्झरी बसेस आणून वातानुकूलित आरामात रस्त्याने प्रवास करण्यास प्राधान्य देत, प्रवाशांना आकर्षित करण्याची योजना आखत आहे. या प्रवासात प्रवासी त्यांचे काम करू शकतात, ब्राउझ करू शकतात किंवा पॉवर नॅप घेऊ शकतात.
बोरिवली आणि ठाणे या पश्चिम आणि पूर्व उपनगरांपासून सुरू होणाऱ्या आणि दक्षिण मुंबईला जाणाऱ्या या बसेस निश्चित मार्गांवर चालतील आणि त्यांना मर्यादित थांबे असतील. बेस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या निविदा प्रक्रियेनंतर लक्झरी बस ताफ्यात येण्यासाठी विविध पूर्व शर्तींवर अंतर्गत चर्चा सुरू आहे. या सिंगल-डेकर एसी लक्झरी बसेसची किंमत 1.5-2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.
बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही ग्राहकांसाठी लक्झरी बसेस सादर करण्याच्या योजनांवर काम करत आहोत. आम्ही या बसेस अॅप-आधारित बस आणि कॅब ऑपरेटर्सद्वारे पुरवलेल्या मार्गांवर चालवू इच्छितो. आरामदायी प्रवासासाठी उत्सुक असलेल्या रायडर्सला आम्ही लक्ष्य करू इच्छितो. हे भाडे साहजिकच नेहमीच्या भाड्यापेक्षा जास्त असेल. म्हणूनच आम्ही यासाठी कॉर्पोरेट संस्थांना लक्ष्य करण्याचा विचार करत आहोत.’ (हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापूरात 1 रुपया प्रति लिटरप्रमाणे पेट्रोलचं वाटप)
या बसेस सध्या शहरांतर्गत मार्गांवर धावणाऱ्या लक्झरी बसेससारख्या असतील. यामध्ये हेडरेस्ट्स आणि इतर सुविधांसह प्रत्येक सीटवर लॅपटॉप आणि मोबाइल चार्जिंग पॉइंट असतील, बाटलीबंद पाणीही उपलब्ध असेल. या बसेसचे थांबे मार्ग, प्रवाशांच्या संख्येसह वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वरळी, नरिमन पॉइंट, लोअर परळ आणि प्रभादेवी इथल्या कार्यालयाच्या ठिकाणांवर अवलंबून असतील. या बसेस पूर्व उपनगरातील ठाणे, मुलुंड आणि घाटकोपर आणि पश्चिम उपनगरात बोरिवली, गोरेगाव आणि अंधेरी येथून सुरु होणार असण्याची शक्यता आहे. परंतु त्यांचे पिक-अप आणि ड्रॉप पॉइंट्स मागणीवर अवलंबून असतील.