BEST Bus Depots Parking Facility: मुंबई मध्ये निवडक बेस्ट बस डेपो मध्ये आता नागरिकांना मिळणार सशुल्क पार्किंगची सोय; इथे पहा अधिक तपशील!
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

'बेस्ट'च्या 75 व्या वर्धापन दिना निमित्त मुंबईकरांसाठी एक मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे. मुंबई आणि ट्राफिक हे जणू समीकरण आहे. मुंबईत चारचाकी चालकांना पार्किंग शोधण्यासाठी मोठे कष्ट असतात. यामधूनच अनेकदा रस्त्यांवर अवैध पार्किंग करून अजून ट्राफिकची समस्या वाढवली जाते. पण यावर तोडगा म्हणून प्रायोगिक तत्त्वावर आता 7 ऑगस्टपासून मुंबईत काही बेस्ट डेपोमध्ये चारचाकी चालकांना पार्किंगची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

बेस्टच्या या योजनेचा शुभारंभ मुंबईत काही ठराविक ठिकाणी होणार आहे. यामध्ये दोन प्रकारची पार्किंग सेवा उपलब्ध असणार आहे. एक ज्यामध्ये तुम्ही गाडी बस डेपोच्या गेट वर सोडू शकता आणि स्किल्ड ड्रायव्हर ती पार्क करतील आणि दुसरा सेल्फ पार्किंगचा देखील पर्याय असेल. सुरूवातीला कुलाबा, मुंबई सेंट्रल, वांद्रे, वरळी आणि दिंडोशी आगारात ही सेवा मिळणार आहे.

Park+App mobile app च्या मदतीने चालकांना डेपो मधील उपलब्धतेची माहिती मिळणार आहे. आगाऊ पार्किंग स्पेस बुक करण्याची देखील सोय असणार आहे. यासाठी 5 रूपये अधिक शुल्क आकारले जाणार आहे.

दादर मध्ये यापूर्वी पालिकेने असा पार्किंग जागा शोधण्याचा त्रास आणि वेळ यावर तोडगा काढला होता. त्यांनी व्हेले पार्किंग साठी प्रायोगिक तत्त्वावर एक उपक्रम राबवला होता पण सध्या तो बंद आहे. नक्की वाचा: दादर मध्ये सुरू झालं देशातलं पहिलं डिजिटलाईज्ड Valet Parking; पहा कशी आहे सुविधा!

बेस्ट कडून सुरू करण्यात आलेल्या व्हेले पार्किंगच्या सुविधेमध्ये  कोणत्याही वाहनासाठी 2 तासांपर्यंत 100 रुपये आकारले जातील. दोन तासांनंतर प्रत्येक तास वा त्या नंतरच्या कालावधीसाठी 30 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. सेल्फ पार्किंग मध्ये पहिल्या तीन तासांसाठी दुचाकीला 20 रुपये, तीन आणि चार चाकीसाठी पहिल्या तीन तासांसाठी 30 रुपये ट्रक-टेम्पोसाठी पहिल्या तीन तासांसाठी 55 रुपये, स्कूल बस व खासगी बससाठी पहिल्या तीन तासांसाठी 60 रुपये पार्किंग शुल्क आकारण्यात येणार आहे.