Rajgad Fort Pixabay

पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगडावर गेलेल्या पर्यटकांच्या गटावर आज सकाळी अकराच्या सुमारास मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. हे सर्व पर्यटक मुंबई आणि पुण्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. सुवेळा माचीवर फिरत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये चार पर्यटक गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारांसाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे. (हेही वाचा - Navi Mumbai Metro: लवकरच सुरु होणार नवी मुंबई मेट्रो, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन होण्याची शक्यता)

आज सकाळी 11 च्या दरम्यान राजगडावरील सुवेळा माचीवर मधमाशांनी एका पर्यटकांच्या गटावर हल्ला केला. पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे यांना माहिती मिळताच त्यांनी प्रशासन आणि बचाव पथकाशी संपर्क साधला. पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आणि तहसीलदार दिनेश पारगे यांनी पोलीस आणि आरोग्य विभागाशी संपर्क साधला. पाली आणि वाजेघर गावातून काही लोक मदतीसाठी वर गेले. चादरीची झोळी करून जखमी चार जणांना खाली आणले. यानंतर या चौघांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

राजगडावरील सुवेळा माची आणि नेढे परिसरात अनेक ठिकाणी मधमाशांची पोळी आहेत. यापूर्वीही राजगडावर या भागात मधमाशांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या पर्यटकांनी अंगावर मारलेल्या परफ्युमुळे मधमाशांनी हल्ला केला असावा, असा अंदाज गावकऱ्यांनी सांगितले.