Jalyukt Shivar | Representational Image (Photo Credits: Pixabay)

जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या घोटाळा (Jalyukt Shivar Scam) प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळा प्रकरणी तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी पाच वर्षांपासून सुरु होती. अटक करण्यात आलेले निवृत्त अधिकारी हे सेवेत असताना कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत होते. परळी पोलीस स्टेशनमध्ये 2017 मध्ये जलयुक्त शिवार (Jalyukt Shivar Abhiyan) घोटाळ्यासंदर्भात दोन कोटी 41 लाख रुपयांचा अपहार झालेबाबत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्हात पोलिसांनी तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

सुनील गीते (वय 58), उल्हास भारती (वय 64), त्र्यंबक नागरगोजे (वय 64) अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे. या तिघांनाही त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. परळी पोलीस स्टेशनमध्ये 2017 मध्ये दाखल गुन्ह्यानुसार तब्बल दोन कोटी 41 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे या अपहारामध्ये कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी आणि कंत्राटदारांच्या नावाचा समावेश आहे. (हेही वाचा, Jalyukt Shivar Scheme: फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त शिवार योजने'च्या खुल्या चौकशीसाठी निवडावयाच्या कामांचा शोध घेण्याकरिता समिती गठित; 6 महिन्यात देणार अहवाल)

औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकानी जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हटले होते की, 90 लाख रुपये वसूल करण्यात यावेत. एका बाजूला हा आदेश असतानाच पोलिसांनी दुसऱ्या बाजूला अटकसत्र सुरु केले आहे.

बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्या तील संस्था आणि अधिकाऱ्यांना 90 लाख रुपये वसूल करण्याचे औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकानी आदेश दिले होते या आदेशा सोबतच पोलिसांनी सुद्धा अटकेची कारवाई सुरू केली आहे.