Thane: 2002 बांग्लादेश बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला 16 वर्षांनी ठाणे पोलिसांकडून अटक
Representational Image (Photo Credits: File Photo)

बांग्लादेश (Bangladesh) मध्ये 2002 साली मशिदीत आणि मशिदीबाहेर झालेल्या एकूण तीन बॉम्बस्फोटातील आरोपी मोफाज्ज्ल हुसेन उर्फ मोफा अली गाझी उर्फ मफीजुल केराअली मंडल याला ठाणे गुन्हे शाखेकडून ठाणे शहरात अटक करण्यात आली आहे. मंडल याला बांग्लादेश उच्च न्यायालयाने 2004  मध्ये जन्मठेपेची शिक्षा शिक्षा सुनावली होती.मात्र 2004 मध्ये वैद्यकीय कारण देत या आरोपीने जामीन मिळवला आणि त्याच वेळी तो फरार झाला, त्यानंतर आता तब्बल 16 वर्षांनी पोलिसांना या आरोपीला बेड्या ठोकण्यात यश मिळाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, बांग्लादेश येथे झालेल्या 2002  सालच्या या बॉम्बस्फोटात एक ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. तर स्वतः आरोपीच्या हातात एका गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. यामध्ये आरोपीचा उजवा हात तुटला होता. यावेळी पोलिसांनी त्याला अटक करून 2004 मध्ये सुनावणीत उच्च न्यायालयाकडून त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याच वर्षी हात तुटल्याने होत असणाऱ्या त्रासामुळे वैद्यकीय कारण देऊन त्याने जामीन मिळवला होता.

दरम्यान, यांनतर तो जामीन मिळताच फरार झाला आणि थेट तो पश्चिम बंगालमध्ये मफीजुल केराअली मंडल या नावाने राहू लागला असे. याठिकाणी तो बिगारी आणि मजुरीचे काम करू लागला. कामानिमित्त यापूर्वी तो अनेकदा मुंबई, नवी मुंबई येथे आला आहे, मात्र यावेळेस संशयातून ठाणे पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला.