Balaji Tambe | PC: Twitter

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Balaji Tambe) यांचे निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बालाजी तांबे यांच्यावर पुण्यातील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते पण आज (10 ऑगस्ट) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बालाजी तांबे यांनी योग, आयुर्वेद आणि संगीतोपचार याच्या बाबत महाराष्ट्रासह देशा-परदेशात काम केले आहे. लोणावळा जवळ कार्ले येथे त्यांनी 'आत्मसंतुलन व्हिलेज' (Atmasantulana Village) ची देखील स्थापना केली आहे. आजही तेथे आयुर्वेद उपचार केले जातात. नक्की वाचा: Balaji Tambe Passes Away: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ते आमदार रोहित पवार यांच्याकडून आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना ट्वीट द्वारे श्रद्धांजली.

दरम्यान सुदृढ नव्या पिढीसाठी बालाजी तांबे यांनी ''गर्भसंस्कार'' या पुस्तकाचे लेखन केले त्यानंतर इंग्रजी भाषेतही त्याचे अनुवाद झाले. यासोबत अन्य सहा भाषांमध्येही अनुवाद झाले आहे. सकाळ वृत्तपत्रासोबत बालाजी तांबे काम करत होते. 'फॅमिली डॉक्टर' हे त्यांचे सदर/पुरवणी विशेष गाजली. जनसामान्यांना अत्यंत साध्या शब्दात आयुर्वेदाची महती,  योगाचं महत्त्व पटवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. यासोबत ते अध्यात्माचे देखील अभ्यासक होते. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते त्यांच्याकडे कार्ला ला आत्मसंतुलन व्हिलेजला आले होते. राजकीय  नेत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनी  आयुर्वेदाचार्यांचा आरोग्यविषयक सल्ला घेतला होता. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हीने त्यांच्यासोबत खास कार्यक्रम केले आहेत.

बालाजी तांबे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलं, सुना आणि नातंवडं असा घरगुती परिवार आहे. बालाजी तांबे यांचे शिक्षण अभियांत्रिकी क्षेत्रात झाले होते मात्र लहानपणापासून पूजा अर्चना आणि आयुर्वेदाचा त्यांचा पर्यायी अभ्यास सुरू होता. त्यामधून नंतर त्यांनी पूर्णवेळ आयुर्वेद अभ्यास, चिकित्सक म्हणून काम करण्याचे ठरवले.