Bala Nandgaokar 'मनसे' ला रामराम ठोकत शिवसेना मध्ये परतणार? पहा सोशल मीडीयामध्ये वायरल होत असलेल्या मेसेज वर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया
Bala Nandgaonkar and Raj Thackeray (Photo Credits: FB and PTI)

मनसे अध्यक्ष पुण्यात पोहचण्याच्या आधीच त्यांच्या धडाडीच्या कार्यकर्त्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombre)  यांनी राजीनामा धाडल्याने मनसे साठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. रूपाली ठोंबरे यांनी आज एनसीपी (NCP) मध्ये प्रवेश केल्यानंतर आता सोशल मीडीयामध्ये बाळा नांदगावकर (Bala Nandgaokar) शिवसेनेमध्ये (Shiv Sena) परतणार असल्याचे मेसेज फिरायला लागले आहेत. दरम्यान लोकसत्ता सोबत बोलताना बाळा नांदगावकर यांनी या सोशल मीडीयामधील मेसेज वर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'राज ठाकरे यांच्यासोबत आपण पुणे दौर्‍यावर नसल्याने शिवसेनेमध्ये परतणार असल्याच्या' बातम्या सोशल मीडीयामध्ये फिरत असल्याचं बाळ नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत 18 डिसेंबरला बाळा नांदगावकर यांच्या मतदार संघात कार्यालयाचे उदघाटन राज ठाकरेंच्या हस्ते होणार असल्याने त्याच्या तयारीसाठी पुण्याला न जाता मुंबईत आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान राज ठाकरे सध्या नाशिक, औरंगाबाद पाठोपाठ पुणे दौर्‍यावर आहेत. बाळा नांदगावकर हे सावलीप्रमाणे राज ठाकरेंसोबत असणार्‍यांपैकी एक मनसे नेते आहेत. जुलै महिन्यातच आदित्य शिरोडकर आणि राजन शिरोडकर यांनी मनसेची साथ सोडली आहे. त्यांनी शिवसेना मध्ये पुन्हा पक्षप्रवेश केला आहे. तत्पूर्वी शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर या देखील राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे.  नुकताच रूपाली ठोंबरेंनी मनसेला रामराम ठोकल्याने आता उलट सुलट चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

2005 मध्ये शिवसेनेला राज ठाकरेंनी रामराम ठोकला तेव्हा शिवसेनेचे आमदार असूनही बाळा नांदगावकरांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरेंची साथ दिली आहे. नंतर मनसे कडून त्यांना आमदारकीसाठी, खासदारकी साठी तिकीट देखील देण्यात आले. मनसे कडून देण्यात आलेल्या सार्‍याच जबाबदार्‍यांमध्ये ते राज ठाकरेंसोबत दिसले आहे. अनेक घरगुती कार्यक्रमांमध्येही त्यांचा ठाकरे कुटुंबियांसोबत वावर असतो.