अक्षय तृतीयेला मनसे कडून आयोजित महाआरती कार्यक्रमामध्ये  VHP, Bajrang Dal देखील होणार सहभागी
Bajrang Dal (Photo Credits-IANS)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या बहुचर्चित औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. औरंगाबाद मध्ये सध्या मनसैनिक तयारीला लागले आहेत. दरम्यान आज मनसे नेते अजय शिंदे (Ajay Shinde) यांनी दिलेल्या माहितीनुसार मनसे आणि विश्व हिंदू परिषद (VHP), बजरंग दल ( Bajrang Dal) यांच्या वरिष्ठ नेत्यांची पुण्यात एक बैठक झाली आहे. हिंदुत्त्वाचा मुद्दा हातात घेऊन आता नव्याने नवनिर्माण करायला निघालेल्या मनसेला आपला पाठिंबा असल्याचं विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी संगितलं आहे.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल येत्या 3 मे दिवशी मनसेकडून होणार्‍या महाआरतीला देखील पाठिंबा देणार आहेत. अक्षय्य तृतीया या हिंदूंच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणार्‍या मंगलपर्वादिवशी मनसेने महाआरतीचं आयोजन केले आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हे या महाआरतीमध्येही सहभागी होणार आहेत. हे देखील नक्की वाचा: Ramdas Athawale on Loudspeaker Row: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे लाऊडस्पीकर वादावर मोठे वक्तव्य, म्हणाले, 'आमचा पक्ष मशिदींचे संरक्षण करणार' .

गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला आहे. राज्य सरकारने भोंगे उतरवले जाणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे. काही मौलवींनी स्वतःहूनच सर्वोच्च न्यायालयाचे पालन करणार असल्याचं सांगितलं आहे तर काहींनी भोंगे उतरवणार नाही असे सांगत मनसेला आव्हान दिले आहे. रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत भोंगे उतरवण्यास अल्टिमेटम दिलं आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर राहणार आहे.

आज दुपारी राज ठाकरे औरंगाबादच्या सभेसाठी निघाले आहेत. औरंगाबादला सभेत येण्यापूर्वी त्यांचा पुण्यात  दोन दिवसीय दौरा आहे. पुण्यातून राज ठाकरे सभास्थळी पोहचणार आहेत.