Baby Washed In Water: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rains in Mumbai) कोसळतो आहे. या पावसामुळे मध्य रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याचे पुढे येत आहे. अंबरनाथ लोकल ठप्प झाली असताना एका महिलेच्या हातून चार महिन्यांचे बाळ हातातून निसटले आणि ते पाण्यासोबत वाहून गेले आहे. काळजाचा ठोका चुवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये वाहत्या पाण्याकडे पाहून बाळाच्या आठवणीने महिलेने फोडलेला हंबरडा काळजाचा ठोका चुकवत आहे. वाचकांना सूचना अशी की, हा व्हिडिओ तुमचे लक्ष विचलीत करु शकतो.
मुंबईमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शिवाय मुंबईची नस म्हणून ओळख असलेल्या लोकल ट्रेनवरही पावसाचा मोठाच परिणाम झाला आहे. खास करुन मध्य रेल्वे अत्यंत धिम्या गतीने धावत आहेत. काही ठिकाणी ती ठप्प झाली आहे. अंबरनाथ येथेही मध्य रेल्वे ठप्प झाल्याने प्रवासी गाडीतून खाली उतरत होते. यामध्ये पीडित महिलेचाही समावेश होता. ती आपल्या चार महिन्याच्या बाळाला सोबत घेऊन खाली उतरत असताना तिच्या हातून चुकून बाळ निसटले आणि थेट पाण्यात पडले. पावसाच्या पाण्यामुळे वाहत्या पाण्याला जोर होता. प्रवाहासोबत बाळही वाहून गेले. (हेही वाचा, Kalyan Station Point Failures: मुसळधार पावसात कल्याण स्टेशन वर पॉईंट फेल्यूअर; कल्याण -कसारा- कल्याण सेवा ठप्प)
व्हिडिओ
अंबरनाथ लोकल वाहतूक ठप्प झाली असतानाच एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. चार महिन्यांचे बाळ हातातून निसटल्याने पाण्यात वाहून गेलं.#Mumbai #ambernath #MumbaiRain pic.twitter.com/yYU8bZn5ke
— News18Lokmat (@News18lokmat) July 19, 2023
व्हिडिओमध्ये बाळाच्या ओढीने महिला जीवाच्या अकांताने ओरडताना दिसते आहे. उपस्थित परिचीत आणि प्रवासी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिच्या बाळाबाबतच्या चौकशीला कोणाकडेच उत्तर नाही. डोळ्यासमोर पोटचा गोळा असा पाण्यात जाताना पाहून तिने फोडलेला हंबरडा उपस्थिच्याही डोळ्याच्या कडा ओला करतो आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता. मात्र, सूचना अशी की हा व्हिडिओ आपणास विचलीत करु शकतो.