अयोध्या निकालानंतर मुंबईच्या डब्बेवाल्यांनी घेतली मुस्लिम बांधवांची भेट; भेंडी बाजार मध्ये पाहायला मिळाला एकतेचा सोहळा (Watch Video)
Mumbai Dabbawalas meet Muslims after the Ayodhya verdict (Photo Credits: File Image)

भारताच्या राजकीय व ऐतिहासिक क्षेत्रातील प्रलंबित खटला म्हणजेच अयोध्या राम मंदिर (Ayodhya Dispute) प्रकरणावर आज 9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आपला अंतिम निर्णय दिला आहे. या निकालानंतर देशात सुव्यवस्थेला तडा जाण्याची शक्यता असताना सर्वत्र पोलीस प्रशासनाला सज्ज ठेवण्यात आले होते, मात्र निकाल हाती आल्यापासूनच या शक्यतेच्या अगदी उलट प्रतिक्रिया देशात उमटताना दिसत आहेत. हिंदू- मुस्लिम धर्मगुरू व नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत ऐक्याचे संदेश दिले आहेत. असाच एक प्रकार मुंबईतील भेंडी बाजार (Bhendi Bazaar) परिसरात देखील पाहायला मिळाला. काही वेळेपूर्वीच मुंबईच्या डब्बेवाला असोसिएशनच्या (Mumbai Dabbewala Associations) काही कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेतली. या वेळी मेमन जमातीचे सचिव अयुब मेमन (Ayub Memon) हे देखील उपस्थित होते. या भेटीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत असून हिंदू मुस्लिमाच्या या ऐक्याचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये मुस्लिम नागरिक प्रतिक्रिया देताना, आपण अयोध्या प्रकरणी निर्णयाचे स्वागत करत असून यापुढे देखील हिंदू मुस्लिमांचे ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली आहे तर, मुंबई डब्बावाला असोसिएशनच्या या सभासदांनी "मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना" असे म्हणत अन्य देशवासियांना देखील आपल्या मुस्लिम बांधवांसोबत बंधुभावाने राहण्याचा सल्ला दिला आहे.

पहा हा व्हिडीओ

'5 एकर जमीनीची खैरात आम्हाला नको', सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी नाराज

दरम्यान, अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निकाल देताना मुख्य वादग्रस्त भूमी ही रामल्लाच्याच नावे असल्याचे मान्य केले असून मशिदीसाठी वैकल्पिक पाच एकर जागा देण्याचा निर्णय सुनावला आहे. या नंतर पुढील तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करून मंदिर बांधणीस सुरुवात करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. या निर्णयाने आज देशभरातील मोठा वाद संपुष्टात आल्याचे म्हंटले जात आहे.