
औरंगाबाद (Aurangabad) मध्ये आईनेच पोटच्या लेकरांनचा गळा दाबून जीव घेतल्याची घटना मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सादात नगर भागातील ही 6 फेब्रुवारीची घटना आहे. अल्पवयीन आईने लेकरांचा जीव घेतल्याच्या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी अटक करून कारण विचारले तेव्हा कबुली मध्ये तिने मुलांना सांभाळणं असह्य झालं असल्याने जीव घेतल्याचं म्हटलं आहे.
आरोपी माहिला आलिया फहाद बसरावी आहे. 22 वर्षीय या आईने मुलं अदीबा फहाद बसरावी (वय 6 वर्षे) आणि अली बिन फहाद बसरावी (वय 4 वर्षे) यांचा झोपेत असतानाच गळा दाबून मारलं. मुलांना सांभाळणं कठीण झाल्याने चिडचिड व्हायची परिणामी सारं संपवून यामधून बाहेर पडण्याच्या उद्देशाने मुलांची हत्या केली असल्याचं महिलेने पोलिस चौकशीत सांगितलं आहे.
पोलिसांना 6 फेब्रुवारीला सख्या बहिण-भावाचा घरातच संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. रात्री आईवडिलांसोबत जेवण करून ही लेकरं झोपली होती. पण सकाळी ती बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळली. त्यांच्या कुटुंबीयांनी सकाळी घाटी रूग्णालयामध्ये त्यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये दाखल केले होते. पण डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवताच आईने आपल्या मुलांचा जीव घेतल्याची बाब समोर आली आहे.
आलिया अवघी 15 वर्षांची असताना तिचं लग्न झालं होतं. पुढे तिला दोन मुलं झाली. पण या मुलांचं संगोपन करणं तिला कठीण जात होतं. त्यांना सांभाळताना होणारी चिडचिड असह्य झाल्याने तिने अखेर त्यांचा जीव घेण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं.