Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

औरंगाबादच्या (Aurangabad) पैठण (Paithan) मधील रांजणगाव खुरी (Ranjangaon Khuri) येथे दीड वर्षांच्या चिमुकलीसमोर शेतकरी दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा करूण प्रकार समोर आला आहे. गरिबी आणि आर्थिक विंवचना यामधून घर संसार कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या या जोडप्याने अखेर आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. शेतामध्ये कामाला गेलं असताना त्यांनी झाडालाच गळफास घेत आत्महत्या केली.

मृत शेतकरी राजू दामोदर खंडागळे हा 28 वर्षीय होता तर त्याची पत्नी अर्चना राजू खंडागळे ही 26 वर्षीय होती. शुक्रवार 28 जुलैच्या संध्याकाळी सहा-साडेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. नक्की वाचा:  Farmer Suicide in Parbhani: परतीच्या पावसाने सोयाबीनचं नुकसान झाल्याने 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या .

राजू यांची वडिलोपार्जित 2 एकर शेती होती. कुटुंबाची स्थिती हलाखीची होती. आईवडील आणि 2 भावांचा संसार या सार्‍यांचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर करणं त्यांना शक्य नव्हतं. एका शेतकऱ्याची शेती बटाईने केली होती. मात्र त्यातही अतिवृष्टीने नुकसान झालं. आर्थिक ओढाताण होऊ लागल्याने त्यांनी नैराश्यात आत्महत्या करण्याचं ठरवलं. राजूच्या वडिलांनी संध्याकाळी त्याला फोन केला असता आपण शेतातून निघालो असल्याचं कळवलं पण बराच वेळ ते घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्य त्यांच्या शेतावर गेले असता दोघेही मृतावस्थेत आढळले.

पोलिसांनी या घटनेची दखल घेत त्यांना शासकीय रूग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांनी मयत घोषित केले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, बिडकीन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.