अमेरिकेला गेलेला नवरा परत यावा यासाठी बायको, कुटुंबीयांचे सासरच्या दारात आंदोलन; औरंगाबाद येथील घटना
Husband Wife | Image used for representational purpose | (Photo Credits: pixabay)

विविध मागण्यांसाठी महिला, नागरिक, वद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याचे आपण पाहिले असेल. पण, चक्क नवऱ्याविरोधात बायको (Wife) आंदोलनाला बसलेली आपण कधी पाहिले आहे काय? नाही ना? पण, असे घडले आहे. होय, औरंगाबाद शहरात एका बायको आणि तिच्या कुटुंबीयांचे असेच आंदोलन जिल्हाभर चर्चेचा विषय ठरले आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur) येथील ही घटना आहे. इथल्या एका महिलेने अमेरिकेत (United States) असलेला आपला पती परत यावा यासाठी आंदोलन सुरु केले. महत्त्वाचे म्हणजे या लढ्यात ती एकटीच नाही बरं. तिचे कुटुंबीयही तिच्यासोबत आंदोलनाला बसले. आंदोलक पत्नी आणि तिचे कुटुंबीय हे पतीच्या म्हणजेच सासरच्या दारात आंदोलन केले.

सासरच्या दारात सुरु असलेल्या आंदोलत न्याय देण्यात यावा यासाठी घोषणाही दिल्या गेल्या. या एका वेगळ्या आणि अभिनव प्रकारामुळे परिसरात कुतुहल निर्माण झाले आणि बघ्यांचीही गर्दी झाली. प्राप्त माहितीनुसार, प्राजक्ता डहाळे असे आंदोलनकर्त्या पत्नीचे नाव असून, तिचे म्हणने असे की, तिचा पती अमेरिकेला गेला आहे. तसेच, वारंवार विनंती करुनही तो परत येत नाही. तो परत यावा यासाठीच आपण आंदोलन करत असल्याचे तिचे म्हणने आहे. पतीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही प्राजक्ता यांनी केला आहे.

अधिक माहिती देताना प्राजक्ता डहाळे सांगतात की, आपण जे आंदोलन केले ते आपला परत यावा म्हणूनच केलेले होते. हे आंदोलन आपण 13 जानेवारी या दिवशी केले. आंदोलन केल्यावर सासरकडील सासू, दीर आदी मंडळींनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणाचे गांभीर्य पाहता आपल्या जीविताला धोका असून, त्यासाठी आपल्याला पोलीस संरक्षण मिळावी. तसेच, अमेरिकेत असलेला पती परत यावा यासाठी सहकार्य करण्याची मागणीही प्राजक्ता डहाळे करतात. (हेही वाचा, नवऱ्याचे अतिप्रेम; पण कधीच भांडण होत नाही म्हणून बायकोने मागितला घटस्फोट)

दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. अमेरिकेत असलेल्या पतीला संपर्क करुन उभयतांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, दोन्ही कुटुंबीयांशी चर्चा करत सामंजस्याने तोडगा काढून वाद मिटवावा असेही आदेश पोलिसांनी दिले आहेत. दरम्यान, येत्या 13 फेब्रुवारी या दिवशी आपला मुलगा परत येईल अशी माहिती कुटुंबीयांनी दिली असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.