
पेट्रोल महागल्याने पेट्रोल चोरीचा धंदा करणाऱ्या औरंगाबाद (Aurangabad) मधील दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. कर्ज फेडण्यासाठी या तरुणांनी हा मार्ग निवडला. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, किरण रामभाऊ दापके आणि कृष्णा अण्णासाहेब लष्करे अशी या दोन तरुणांची नावे आहेत. पेट्रोलचे भाव वाढल्याने पेट्रोल चोरीच्या धंद्यातून चांगले पैसे मिळत होते. त्यामुळे मौजमजा करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी या दोघांनीही पेट्रोल चोरीचा मार्ग निवडला. दरम्यान, हे दोन्ही आरोपी 9 वी आणि 12 वी पर्यंत शिकलेले असून ते अधूनमधून मजूरीही करतात. (Navi Mumbai: 350 लीटर डिझेलची चोरी करणाऱ्या 3 आरोपींना तळोजा पोलिसांकडून अटक; 15 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त)
रात्रीच्या वेळेस पोलिस औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरातील छत्रपतीनगर या परिसरात गस्त घालत असताना या दोन्ही तरुणांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या हातात प्लास्टिकचे कॅन होते आणि त्यामध्ये 10-12 लीटर पेट्रोल होतं, त्यानंतर पोलिसांनी दोघांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. रात्री पेट्रोल चोरी करुन दिवसा कमी भावाने विकण्याचा धंदा करत असल्याचे तरुणांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. (बिहार: चोरट्यांनी ट्रक हायजॅक करून लुटला 3.5 लाखाचा कांदा)
दरम्यान, पेट्रोलचे दर वाढल्यापासून रात्री पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी कांद्याचे भाव गगनला भिडले होते. तेव्हा कांदा चोरीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. वाढती बेरोजगारी यामुळे गुन्हेगारीला तोंड फुटते. त्यात कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये थांबलेली आर्थिक आवक यामुळे देखील तरुणाई चोरीच्या मार्गाचा अवलंब करते. मात्र या सगळ्यातून सकारात्मक दिशेने वाटचाल करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.