Aurangabad: औरंगाबादमधील एका हॉटेलवर अज्ञातांकडून गोळीबार; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
प्रातिनिधीक प्रतिमा (Gun-encounter)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन असतानाही औरंगाबादमधील (Aurangabad) एका हॉटेलवर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना आज (31 मार्च) मध्यरात्री अडीज वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात 2 अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण काय आहे? याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

औरंगाबादमधील पेडेगाव भागात हॉटेल मनीष इन हे हॉटेल आहे. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री 2 अज्ञात व्यक्ति दुचाकीवरून येऊन या हॉटेलवर गोळीबार करू लागले. त्यावेळी आरोपींनी हेल्मेट घातलेला असल्यामुळे त्यांचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही. मात्र, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हॉटेल मालकाला धमकावण्याच्या उद्देशानं हा गोळीबार केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलीस उपायुक्त निकेश खटमोडे यांनी व्यक्त केला आहे. संबंधित हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथक तयार करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या अधारे त्यांचा शोध घेतला जात आहे. हे देखील वाचा- नागपूरमध्ये मित्राच्या प्रेयसीला दारु पाजल्यानंतर केला बलात्कार, आरोपीला पोलिसांकडून अटक

कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्वभूमीवर शहर परिसरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, रात्री उशिराने जाणाऱ्या चारचाकी, दुचाकींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. मग या घटनेसंदर्भात पोलिसांना माहिती कशी मिळाली नाही? रात्रीची संचारबंदी केवळ नावालाच आहे का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.