लग्न आणि वाद हे समीकरण काही नवे नाही. लग्नात क्षुल्लक कारणांवरून खटके उडतात, भांडणे होतात, हाणामारी होते. काही वेळा हे वाद इतक्या विकोपाला जातात की त्यामुळे लग्न मोडण्याची वेळ येते. आता असेच एक प्रकरण औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातून समोर येत आहे. या ठिकाणी लग्नात नवऱ्या मुलाकडच्यांनी दारू पिऊन घातलेल्या गोंधळामुळे पार पडलेले लग्न काही वेळातच मोडावे लागले. इतकेच नाही तर मुलीकडच्या नातेवाइकांनी वऱ्हाडाला येथेच्छ धुतले व त्यांच्या गाड्या फोडून टाकल्या.
अहवालानुसार, मुंबईतील बच्छिरे कुटुंबातील मुलाचे लग्न जालना जिल्ह्यातील मुलीसोबत ठरले होते. हे लग्न औरंगाबादच्या गांधेली येथे दुपारी साडेबारा वाजता होणार होते. बच्छिरे कुटुंब वऱ्हाडासह गांधेलीत येताच वाजतगाजत लग्नाची तयारी सुरू झाली. लग्न लागण्याच्या अगोदर वरात निघताना वऱ्हाडीतील अनेक जण दारू पिऊ लागले. काही वेळातच जवळ जवळ संपूर्ण वऱ्हाड ‘टुल्ली’ झाले. यामध्ये दुपारचे तीन वाजले तरी लग्न लागले नव्हते. तोपर्यंत वरातीमध्ये मंडळी दारू पिऊन मनोसोक्त नाचत होती.
त्यानंतर विनवण्या केल्यानंतर कसे बसे हे लग्न लागले. लग्न लागल्यानंतर वऱ्हाडींनी जेवणावरून गोंधळ घातला. सोबतच मानपानावरूनही नवरदेवाकडील लोकांनी आक्षेप घेतला. त्यात त्यांच्याकडे पुरोहिताचे अर्धे पैसे मागितले असता ते चिडले व त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. पुढे हा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. हा मारहाणीत काही जण जखमीही झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्याचे हवालदार दिनकर पांढरे, सचिन रत्नपारखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. (हेही वाचा: नागपूरात लग्नमंडपात नवरीने 'आली ठुमकत नार लचकत' गाण्यावर केली जबरदस्त एंन्ट्री; Watch Viral Video)
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला, परंतु पाठवणीच्या वेळी नवऱ्याने आपल्याला मुलगी पसंत नसल्याचे सांगितले. यानंतर मात्र मुलीकडच्या मंडळींचा संयम सुटला व त्यांनी मुंबईच्या वऱ्हाडींना बेदम मारहाण केली. त्यांच्या वाहनांच्या काचा फोडून सीट कव्हरही फाडले. यावेळी काही प्रमाणात दगडफेकही झाली. शेवटी नवरदेवाच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे वागणे, घातलेला गोंधळ, मारहाण पाहून मुलीनेच लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर आपल्या तोडफोड झालेल्या वाहनांसह वऱ्हाड मुंबईला परत गेले. परंतु हे लग्न मोडल्याने मुलीकडची मंडळी दुःखी व चिंतेत होती. अखेर मुलीच्या आत्याच्या मुलाने मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली व रात्री साधारण साडेनऊ वाजता हे लग्न पार पडले.