वारकरी (PC - wikipedia.org)

जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) दहशत निर्माण केली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील नाथषष्ठी उत्सव (Nath Sashti) रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. नाथषष्ठी उत्सवाला राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक एकत्र येत असतात. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे यंदा हा उत्सव करायचा की, नाही यासंदर्भात प्रशासन आणि राज्य सरकरामध्ये चर्चा चालू होत्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने आज याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत यात्रा रद्द केली आहे. प्रशासनाच्यावतीने यासंदर्भात परिपत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

प्रत्येक वर्षी पैठणमध्ये संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी उत्सवासाठी राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी येत असतात. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी जमा होत असते. सध्या देशात तसेच राज्यातदेखील कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नाथषष्ठी उत्सव रद्द करण्यात आला आहे. (हेही वाचा - औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला - इम्तियाज जलील)

पैठण तालुक्यात 'श्री एकनाथ महाराज विश्वस्त मंडळ पैठण' यांच्याकडून प्रत्येक वर्षी 'श्री नाथ षष्ठी महोत्सव' साजरा करण्यात येत असतो. यावर्षी 14 ते 16 मार्च या तीन दिवसात हा उत्सव पार पडणार होता. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या उत्सवावर स्थगिती आणली आहे.

दरम्यान, सरकारकडून गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मनाई केली जात आहे. तसेच अनेक नेते सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपले दौरे रद्द करत आहेत. सोमवारी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपला नाशिक दौरा रद्द केला होता. तसेच कोरोनामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केली आहे.