औरंगाबाद येथील अजब प्रकार; नवरदेवाने हुंड्यात मागितला 21 नखी कासव, लॅब्रोडोर कुत्रा आणि 10 लाख रुपये
Tortoise | Representational Image. Photo credits: Pixabay/PublicDomainPictures)

एका नवरदेवाने अजब हुंड्याची (Dowry) मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद (Aurangabad) मधून समोर येत आहे. औरंगाबादच्या उस्मानपुरामध्ये राहणाऱ्या एका तरुणाचं रामनगर भागात राहणाऱ्या तरुणीसोबत लग्न जुळलं होतं. 10 फेब्रुवारी 2021 रोजी दोघांचा साखरपूडाही पार पडला. परंतु, त्यानंतर मुलाकडच्या लोकांनी अजब हुंड्याची मागणी केली. हुंड्यात 21 नखांचं कासव, काळा लॅब्रोडोर कुत्रा, बुद्धांची मुर्ती, समई आणि 10 लाख रुपये मागण्यात आले.

नवरदेवाच्या कुटुंबियांनी केलेल्या अजब मागणीमुळे मुलीकडचे लोक हैराण झाले. मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे समजताच नवरदेवाच्या कुटुंबियांनी लग्न मोडीत काढले. त्यानंतर मात्र मुलीच्या वडीलांनी पोलिस स्टेशनमध्ये नवरदेव आणि कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली. नवरदेव आणि कुटुंबियांविरोधात आयपीसी कलम 420, 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा खोलवर तपास करणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. (धक्कादायक! हुंडा मिळाला नाही म्हणून पतीने नवविवाहितेवर करवला मित्रांकडून सामुहिक बलात्कार; गुप्तांगाला मिरची व बाम लावून केले बेशुद्ध)

पोलिसच्या वडीलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नवरदेव आणि त्याच्या 5 कुटुंबियांविरुद्ध धोकाधाडीचा गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती उस्मानपुरा पोलिस स्टेशनचे पोलिस इन्स्पेक्टर दिलीप तरे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.

साखरपुड्यापूर्वी मुलीकडच्या लोकांनी 2 लाख रुपये किंमतीची सोन्याची अंगठी नवरदेवासाठी केली होती. तसंच मुलीला सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 10 लाख रुपये देखील घेतले होते. दरम्यान, 21 नखं असलेल्या कासवामुळे अमाप संपत्ती येते, अशी अंधश्रद्धा आहे. या दुर्मिळ कासवाची बाजारात 5-10 लाख रुपये इतकी किंमत आहे.