औरंगाबाद: बजाज कंपनी मध्ये 79 कर्मचार्‍‍यांना कोरोनाची लागण, दोघांचा मृत्यू झाल्याने कंंपनी 2 दिवस बंद - रिपोर्ट
Coronavirus Outbreak | Representational Image| (Photo Credits: IANS)

औरंगाबाद (Aurangabad )मध्ये वाळूंज येथील MIDC मध्ये असणार्‍‍या बजाज कंपनी (Bajaj Auto) मध्ये 79 कर्मचार्‍‍यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे तर 2 जणांचा कोरोना व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार रविवार असे दोन दिवस कंपनी बंद ठेवली जाणार आहे. दरम्यान पुनश्च हरिओम म्हणत Mission Begin Again  3 जून पासून महाराष्ट्रात पुन्हा व्यवहार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. रूतलेली अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान करण्यात मर्यादित कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये आणि खबरदारीची पुरेशी व्यवस्था ठेवत आता राज्यात हळूहळू व्यवहार सुरू झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या उद्योगांना दिलासा: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे आकारण्यात येत असलेल्या विविध शुल्क आकारणीस 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

औरंगाबाद हा महराष्ट्रातील कोरोना हॉट्सस्पॉट पैकी एक आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये 25 जून दिवशी एका दिवसात 230 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. नव्या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 124आणि ग्रामीण भागातील 106 जणांचा समावेश आहे. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 4266 कोरोनाबाधित रुग्ण असून 2217 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 1601 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत 218 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रामध्येही काल (25 जून) काल 24 तासांमध्ये सर्वाधिक रूग्णसंख्येमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. आरोग्य विभगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काल 24 तासांत 4 हजार 841 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 192 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 47 हजार 741 वर पोहचली आहे. यापैकी 6 हजार 931 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 77 हजार 453 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.