पंढरपूरमध्ये चक्क शिक्षकांनी शाळेतील चार मूकबधिर मुलींचा लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. श्री गणेश सेवा मित्र मंडळाच्या मूकबधीर शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. इथे 5 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या 40 विद्यार्थिनी राहण्यास आहेत. ज्ञानोबा मल्हारी मस्के, अर्जून तुकाराम सातपुते, संतोष बाळासाहेब कुलाल, सिद्धेश्वर शंकर वाघमोडे अशी चौघा नराधम शिक्षकांची नावे आहेत. या चारही शिक्षकांवर पॉस्को अॅक्ट व 354 (अ), 354 (ब) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
निर्भया पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभरे हे आपल्या पथकासह संस्थेची पाहणी करण्यासाठी या शाळेमध्ये गेले होते. त्यावेळी या मूकबधिर मुलींनी खाणाखुणा करुन शिक्षकांकडून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला जात असल्याची तक्रार केली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी मूकबधिर व्यक्तींची भाषा कळणाऱ्या विशेष शिक्षिकेला बोलावून या मुलींचा जबाब नोंदवून घेतला असता या लैंगिक छळाची माहिती समोर आली. (हेही वाचा: हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये महिला रुग्णावर सामुहिक बलात्कार; नर्सने इंजेक्शन देऊन केले होते बेशुद्ध)
त्यानंतर ताबडतोब पोलिसांनी या चारही शिक्षकांना अटक केली व त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले, न्यायालयाने या चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.