यवतमाळ (Yavatmal) पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षकाने (Assistant Police Sub Inspector) पोलिस स्टेशनमध्येचं गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीस आले आहे. राजू उईके, असं या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचं नाव आहे. शुक्रवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे यवतमाळ शहरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजू उईके हे गुन्हे शाखेत कार्यरत होते. उईके हे शुक्रवारी रात्री एक वाजेपर्यंत ते ड्यूटीवर होते. रात्री उशिरापर्यंत ते आपल्या कक्षात बसून होते. दरम्यान, सकाळी काही पोलीस शिपाई राजू उईके यांच्या कक्षात गेले, तेव्हा त्यांना उईके गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर पोलिस शिपायांनी पोलिस ठाण्यातील प्रमुख अधिकाऱ्याला यासंदर्भात माहिती दिली. (हेही वाचा - Yes Bank Crisis: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा)
अद्याप राजू उईके यांनी आत्महत्या का केली यासंदर्भात कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. राजू उईके हे कामाचा ताण तसेच जात वैधता प्रमाणपत्राच्या कारणावरून ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असंही म्हटलं जात आहे.
मागील महिन्यात जालन्यातील एका पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. विष्णू रामराव गाडेकर असं आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचं नाव होतं. विष्णू गाडेकर यांनी थायमेंट हे विषारी औषध प्राशन करुन आपलं जीवन संपवलं होतं. अनैतिक संबंधातून महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून विष्णू गाडेकर यांनी आत्महत्या केली होती.