सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार बडतर्फ तर, चार पोलीस कॉन्स्टेबल निलंबीत; आमदार रमेश कदम यांना नियमबाह्य मदत केल्याचा ठपका
MLA Ramesh Kadam | (Photo credit: Archived, edited, representative images)

सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार (Assistant Police Inspector Rohidas Pawar) यांना बडतर्फ तर,  चार पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल डी चव्हाण, डी खेताडे, यू. कांबळे, व्ही. गायकवाड, अशी निलंबन करण्यात आलेल्या चार पोलीस कॉन्स्टेबलची नावे असल्याचे समजते. अण्णाभाऊ साठे महामंडळ (Loksahir Anna Bhau Sathe Vikas Mahamandal) आर्थिक घोटाळा प्रकरणी ठाणे कारागृहात असलेले आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांना नियमबाह्य मदत केल्याने या पाचही जणांवर ठाणे पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली. कारागृहात असलले आमदार रमेश कदम हे दोन दिवसांपूर्वी ठाणे (Thane) शहराजवळील कासारवडवली येथील वाघबीळ नजीकच्या पुष्पांजली सोसायटीत लाखो रुपयांच्या रकमेसह पोलिसांना सापडले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलीस यंत्रणेवर टीकेचा वर्षाव होत होता.

निवडणूक आयोग (Election Commission) विभाग आणि ठाणे गुन्हे शाखा (Thane Police Crime Branch ) युनिट एक यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आमदार कदम हे बेकायदेशीररित्या कारागृहाबाहेर असल्याचे पुढे आले. तसेच, ज्या पुष्पांजली सोसायटीत आमदार रमेश कदम हे पोलिसांना आढळून आले त्यावेळी कदम यांच्यासोबत तब्बल 53 लाख रुपयांची रक्कमही सापडली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आले की, आमदार रमेश कदम यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, जेजे रुग्णालयात तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात नेण्याऐवजी पोलीस इस्कॉर्ट पार्टी अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून त्यांना एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी नेले. (हेही वाचा, तुरुंगात असलेले रमेश कदम लाखो रुपयांच्या रकमेसह ठाणे येथील घरात; निवडणूक आयोग, गुन्हेशाखा पोलिसांची संयुक्त कारवाई)

रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यांच्याकडे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद होते. दरम्यान, या महामंडळात घोटाळा केल्याच्या आरोपाखाली रमेश कदम यांची चौकशी सुरु आहे. सध्या त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली असून, तुरुंगातूनच ते सध्या अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक (2019) लढवत आहेत. अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा केल्याचा आरोप झाल्यानंर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रमेश कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.