Mumbai Police | (File Photo)

महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाकडून 14 पोलिस अधिकार्‍यांना आपली मालमत्ता जाहीर करण्याच्या सूचना आल्या आहेत. मात्र यामधील धक्कादायक बाब म्हणजे या यादीमध्ये शहीद पोलिस ऑफिसर अशोक कामटे आणि आत्महत्या करून आपले जीवन संपवलेले पोलिस अधिकारी हिमांशू रॉय यांचादेखील समावेश आहे. आयपीएस (IPS) आणि आयएएस (IAS) अधिकाऱ्यांना केंद्र सरकार कडे दरवर्षी आपली वार्षिक संपत्ती जाहीर करावी लागते. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी तशी संपत्ती घोषित करायची आहे यामध्ये 14 जणांच्या यादीत सध्या सेवेत असलेल्या केवळ 6 जणांचाच समावेश आहे. त्यामुळे सरकारी कामाचा भोंगळपणा पुन्हा समोर आला आहे.

महाराष्ट्रात गृह विभागाने ऑक्टोबर 2019 मध्ये 14 आयपीएस अधिकार्‍यांची यादी राज्य सरकारकडे पाठवली होती, या यादीत नाव असलेल्या अधिकार्‍यांनी आपलं वार्षिक उत्पन्न जाहीर केलं नसल्याचं सरकारला कळवलं आहे. परंतू या यादीमधील अशोक कामटे यांचे निधन मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना झाला तर हिमांशू रॉय यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. सहाय यांचे नाव देखील या यादीमधून असून त्यांचे निधन 2013 साली झाले आहे. माजी पोलीस उपायुक्त आनंद मांड्या या देखील पोलिस अधिकार्‍याचा मृत्यू 2018 मध्ये झाला आहे. तर यासोबतच 3 निवृत्त अधिकार्‍यांचाही यामध्ये समावेश आहे.

पी.एन. रासकर, दलबीर सिंह भारती, अजय कुमार बंसल, पी.एन. मगर, अंकित गोयल आणि हिरानी ए. मोहन कुमार या अधिकार्‍यांचाही यामध्ये समावेश आहे.