अरुणा ढेरे

जानेवारीमध्ये 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलंय. दरवर्षीप्रमाणे यावेळी संमेलन अध्यक्षपदी कोण विराजमान होईल याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. तर या अध्यक्षपदासाठी लेखिका, कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी महामंडळाच्या यवतमाळ येथे पार पडलेल्या बैठकीत अरुणा ढेरे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

यावर्षीपासून निवडणुकीऐवजी एकमताने, सन्मानाने अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असल्याचा निर्णय महामंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार संमेलनानिमित्त अध्यक्षपदाचा मान मिळवणाऱ्या त्या 5व्या महिला लेखीका ठरल्या आहेत, तर तब्बल 18 वर्षांनी हा मान एका महिला लेखिकेला मिळाला आहे.

हे संमेलन 11 ते 13 जानेवारी 2019 या कालावधीत होणार आहे. यवतमाळमध्ये तब्बल 45 वर्षांनंतर मराठी साहित्य संमेलन होत आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिह्यात शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या विपन्नावस्था या विषयावर परिसंवाद आणि आणि कार्यक्रम साहित्य संमेलनात होतील, असेही श्रीपाद जोशी यांनी यावेळी सांगितले.

यापूर्वी डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी 2001 मध्ये अध्यक्षपद भूषवलं होतं. आतापर्यंत संमेलनाच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष या चारच महिलांना संमेलनाध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. डॉ. ढेरे या पाचव्या महिला संमेलनाध्यक्ष आहेत.

यावेळी ‘संमेलनाच्या माध्यमातून ज्ञान, संस्कृती, परंपरा पुढे नेली जाते. त्या परंपरेची प्रतिनिधी म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे असे मी मानते. ती जबाबदारी पूर्ण करणे हे माझे कर्तव्य मानते. साहित्यरसिकांनी प्रेम व अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. आपल्याजवळ जे जे आहे ते पणाला लावून त्या अपेक्षा पूर्ण करेन’, अशा भावना अरुणा ढेरे यांनी व्यक्त केल्या.