Atul Bhatkhalkar, Sanjay Rathod (Photo Credit: FB/ Twitter)

बीड येथील सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर (Pooja Chavan Suicide Case) संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली होती. पूजा चव्हाणने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप कोणालाच समजू शकलेले नाही. मात्र, पूजा चव्हाण आणि संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे एकसोबतचे फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात थिणगी पडली. या प्रकरणात संजय राठोड यांचा थेट संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना अटक करा, अशी मागणी भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul BhatKhalkar) यांनी केली आहे.

ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गब्रूचा राजीनामा. महाराष्ट्राच्या जनतेची जराही चाड असेल तर आता तरी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांना अटक करा, असे म्हणत अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच अठरा दिवस पुरावे नष्ट करण्यासाठी दिल्यानंतर संजय राठोड याने दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या सुसंस्कृत पणाचा बुरखा फाडून गेलाय. आता FIR दाखल करून त्याला तात्काळ अटक करा, असेही अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्री पदाची धुरा कोणाच्या खांद्यावर? विदर्भातील 'या' नेत्यांची नावं चर्चेत

अतुल भातखळकर यांचे ट्विट-

संजय राठोड यांनी राजीनामा देण्याआधी मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल एक तास चर्चा झाली. या चर्चेवेळी शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

वर्षा निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली.