Sanjay Rathod (Photo Credits: FB)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर विरोधी पक्षाकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर आज अखेर राठोड यांनी कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा दिला. आता संजय राठोड यांच्या जाग्यावर म्हणजेचं वनमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरचं नव्या वनमंत्र्याचे नाव घोषित करतील. सध्या विदर्भातील संजय रायमुलकर आणि गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यापैकी वनमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (वाचा - विधानसभेत पूजा चव्हाणचा मुद्दा उचलून धरणार- नारायण राणे)

संजय रायमुलकर हे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडणुक जिंकली आहे. तसेच गोपीकिशन बाजोरिया हे अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडूण गेले आहेत. गोपीकिशन बाजोरिया हे 2004, 2010 आणि 2016 असे सलग तिसऱ्यांदा शिवसेना आमदार म्हणून निवडूण आले आहेत.

दरम्यान, आज संजय राठोड यांनी आपल्या पत्नीसह वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याची भेट घेतली आणि वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्विकारला. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.