Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
वनमंत्री संजय राठोड (संग्रहित संपादित प्रतिमा)

पूजा चव्हाण प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आल्यानंतर भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी भाजपचे अनेक नेते करत होते. दरम्यान, संजय राठोड यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सोपवला आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली.

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. त्यानंतर पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संजय राठोड अडचणीत सापडले होते. या प्रकरणाशी संजय राठोड यांचा थेट संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना भाजपा नेत्यांनी राठोडांचा राजीनामा घेऊ कारवाई करण्याची मागणी केली होती. ज्यामुळे ठाकरे सरकारवर दबाव वाढला होता. त्यानंतर आज अखेर संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. हे देखील वाचा-विधानसभेत पूजा चव्हाणचा मुद्दा उचलून धरणार- नारायण राणे

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यामुळे वनमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वनमंत्रिपद मिळावे यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय, मुंबई-ठाण्यातील आमदारदेखील वनमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे कळत आहे.