Arnab Goswami | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहात (Taloja Jail) दररोज 3 तास पोलीस चौकशी केली जाणार आहे. अर्णब यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली असून त्यांना 18 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. सोमवारी उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन टाळत सेशन कोर्टामध्ये अर्ज करण्याचे आदेश दिले होते.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली दिसून येत आहे. अशातचं आता भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया (Gaurav Bhatia) यांनी अर्णव यांच्या अटक प्रकरणात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा केला आहे. तसेच भाटीया यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना केलेली अटक पूर्णपणे असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे. (हेही वाचा - Chhagan Bhujbal On Bhagat Singh Koshyari: राज्यपालांनी अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये, सरकार त्यांची नियमांनुसार काळजी घेत आहे - छगन भुजबळ)

अर्णव गोस्वामी यांना अलिबाग येथून तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब यांची तळोजा कारागृहात चौकशी करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती रायगड पोलिसांनी अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात करण्यात केली होती. त्यानंतर आज मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी यासंदर्भात निर्णय दिला आहे. न्यायालयाने रायगड पोलिसांना कारागृहात अर्णब यांच्या चौकशीसाठी परवानगी दिली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, रायगड पोलिस कारागृहात दररोज तीन तास अर्णव गोस्वामीची चौकशी करू शकतात.

दरम्यान, सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्या, अशी सूचनादेखील गृहमंत्र्यांना दिली होती.