
भारतामध्ये कृषी कायद्याविरूद्ध (Farm Law) 55 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अद्यापही कायम आहे. शेतकरी नेते आणि सरकार यांच्यामध्ये बैठकांच्या फेर्या सुरू आहेत. दरम्यान अशातच आता ज्येष्ठ समाजासेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी देखील उपोषणाची साद दिली आहे. दिल्लीमध्ये उपोषणासाठी मैदान द्यावं अशी त्यांची मागणी होती. मात्र त्यावर सरकारकडून उत्तर आलेले नाही. त्यामुळे आता अण्णा हजारे 30 जानेवारीपासून त्यांच्या गावी म्हणजे राळेगणसिद्धी (Ralegan Siddhi) मध्ये उपोषणावर बसण्यासाठी ठाम असल्याच त्यांनी सांगितलं आहे. हे अण्णा हजारे यांचे शेवटचं उपोषण असणार आहे. Anna Hazare यांनी शेतकर्यांना पाठिंबा देण्यासाठी जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यात उपोषण करण्याचा दिला इशारा.
कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करून त्यानुसार शेतीमालाच्या किमती ठरविणे या प्रमुख मागण्यांसाठी अण्णा हजारे यांचे हे आंदोलन असेल. दरम्यान अण्णांनी आंदोलनाची हाक देताच महाराष्ट्रातील काही भाजपा नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र अण्णा आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं चित्र आहे. हुतात्मा दिनाचं औचित्य साधत ते 30 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे.
उपोषणाची माहिती देताना त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकार वर ताशेरे ओढले आहेत. अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हा इशारा देतानाच सरकारला स्वामिनाथन आयोगाची आठवणही करून दिली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी आणि पिकांना उत्पादन खर्च योग्य मिळावा यासाठी कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता दिली पाहिजे. या आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याची अण्णांची मागणी होती. दरम्यान त्यासाठी उच्च स्तरीय तज्ज्ञांची समिती स्थापन करून निर्णय घेण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. परंतु, हे आश्वासनही पूर्ण करण्यात आलेलं नाही असेही अण्णांनी मोंदीना पत्रामध्ये म्हटलं आहे. भाजीपाला, फळ, फूल, दुधावर एमएसपी निर्धारित करण्याचंही आश्वासन दिलं होतं. 6 हजार कोटी रुपये खर्च करून कोल्ड स्टोरेज बनविण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. परंतु, तीन वर्षे होऊन गेलीत कोणतंही आश्वासन पूर्ण केलं गेलं नाही. त्यामुळे शेतकरी हा सर्व माल रस्त्यावर फेकत आहेत. हे पाहून प्रचंड वेदना होत आहेत, त्यामुळे शेतकर्यांच्या हितासाठी उपोषणाचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.