
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya यांनी केलेल्या आरोपाला राज्याचे परीवहन मंत्री, शिवसेना (Shiv Sena) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर आरोपांची राळ उडवणाऱ्या किरीट सोमय्या यांची आरोपांची मालिका एकदा संपू देत. ती संपली की दिवाळी (Diwali) नंतर किरीट सोमय्या यांना आणि त्यांच्या आरोपांना एकदाच शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. सोमय्या यांना केवळ आरोप करण्याचे एकच काम आहे. त्यामुळे तेवढेच काम ते करत असतात. त्यांना जे काही आरोप करायचे आहेत ते करु देत, असेही परब म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरोप करत आहेत. या आरोपांमुळे शिवसेनाही आता आक्रमक झाली आहे. थेट मुख्यमंत्री ठाकरे यांनाच लक्ष्य केल्यामुळे शिवसेना नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे. दरम्यान, नंतर आम्ही जे आरोप करु ते सहन करण्याची तयारी ठेवा असेही परब या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Kirit Somaiya On CM Uddhav Thackeray: किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिल्डरला 345 कोटी रुपये गिफ्ट दिले')
सोमय्या यांचे आरोप लोकशाहीला धरुन नाहीत- किशोरी पेडणेकर
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या आरोपांना मुंबई महापालिका महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनीही जोरदार प्रत्युतर दिले आहे. किरीट सोमय्या हे जे आरोप करत आहेत ते लोकशाहीला धरुन नाहीत. त्यांना जे आरोप करायचे आहेत ते करु द्या. त्या सर्व आरपांची उत्तरे आमच्याकडे आहेत. परंतू, त्यांनी काहीही आरोप केले तर उटसूट आम्ही त्याला प्रतिक्रिया किंवा उत्तर देत बसणार नाही. आम्हाला इतरही बरीच कामे आहेत. सोमय्या जर न्यायालयात जाणार असतील तर त्यांनी जरुर जावे. आम्ही तिथेही आमचे म्हणने मांडू असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
सोमय्या माहिती नसताना आरोप करत आहेत- संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राूत यांनी सोमय्या यांच्या आरोपावर बोलताना म्हटले की, मुख्यमंत्री ठाकरे यांचा नाईक कुटुंबाशी झालेला व्यवहार हा कायदेशीर आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कोणताही व्यवहार करण्यास कोणालाही बंधन नाही. पण किरीट सोमय्या यांना काहीही माहिती नाहीत. तरीही ते गिधाडासारखे आरोप करत फिरत आहेत. त्यांनी केलेले आरोप सिद्ध करुन दाखवावेत. बाप दाखवावा नाहितर श्राद्ध करावे, अशा शब्दात संजय राऊत यांनीही सोमय्या यांना इशारा दिला आहे.