मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी ब्लिडरला 345 कोटी रुपये गिफ्ट दिले आहेत, असा सनसनाटी आरोप भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी आज केला आहे. मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमय्या हे गेले दोन-तीन दिवस सलग मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करताना दिसत आहेत.
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, येत्या 28 नोव्हेंबरला ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होतं आहे. त्या निमित्त ठाकरे सरकारच्या कार्यकाळात झालेल्या आणखी तीन घोटाळ्यांबाबत कायदेशीर कारवाई सुरु करणार आहे. त्यासाठी एक याचिका लोकायुक्तांकडे आणि दोन याचिका मुंबई हायकोर्टात दाखल होणार असल्याचेही सोमय्या यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Kirit Somaiya On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांसोबत नेमके काय संबंध आहेत जाहीर करावे- किरीट सोमय्या)
किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप
- रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात ठाकरे सरकार गुंतलं आहे.
- दहिसर जमीन घोटाळ्याबाबत माहिती द्यावी.
- अल्पेशा अजमेरा बिल्डरने जी जमीन 2 कोटी 55 लाख रुपयांत घेतली ती जमीन मुंबई महापालिका 900 कोटी रुपयांना खरेदी करण्यासाठी निघाली आहे. त्यातील 354 कोटी रुपये आगोदरच दिले आहेत, असेही सोमय्या यांनी म्हटले.
- उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर दुसऱ्याच दिवशी अल्पेशा
- अजमेला या बिल्डरला 345 कोटी रुपये गिफ्ट म्हणून देण्यात आले.
- अन्वय नाईक यांच्यासोबत ठाकरे कुटुंबीयांचे संबध होते आणि आहेत. सातबाराच हे सांगोत आहे. जर ते खोटे असेल तर उत्तर द्या असेही सोमय्या म्हणाले.
दरम्यान, मी केलेल्या आरोपांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावे. संजय राऊत किंवा शिवसेनेच्या इतर कोणत्याही नेत्यांमध्ये माझ्या आरोपांवर बोलण्याची हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावे असेही आव्हान सोमय्या यांनी दिले.