राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात आणखी 6 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील नागरिक वारंवार या सुचनेचं उल्लघंन करत आहेत. अशातच आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी नागरिकांना कडक इशारा दिला आहे.
अनेकदा सांगूनही लोक घराबाहेर पडत असतील तर पोलिसांना ‘पोलिसी खाक्या’ दाखवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा अनिल देशमुख यांनी राज्यातील नागरिकांना दिला आहे. राज्यात लॉकडाउन असतानादेखील लोक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे सरकारला राज्यात संचारबंदी लागू करावी लागली, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 107 वर; पाच जणांची चाचणी पॉझिटिव्ह)
देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 450 हून अधिक झाली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील सरकारला सहकार्य करावे, असं आवाहन अनिल देशमुख यांनी केलं आहे.