
मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. राज्य सरकार गेल्या काही दिवसांपासून अनेक निर्बंध लागू करत आहे. अनेक शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. सध्या सरकारने धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीमध्ये मंदिरेही पुन्हा बंद होतात की काय अशी भीती वाटू लागली. आता अंगारकी चतुर्थी (Angaraki Chaturthi) दिवशी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक (Siddhivinayak Temple) मंदिरामध्ये जाऊन बाप्पांचे दर्शन घेता येणार नाही. या दिवशी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मात्र, ज्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे किंवा ज्यांच्याकडे या रजिस्ट्रेशनचा क्यूआर कोड अशा भाविकांना मंदिरामध्ये गणपतीचे दर्शन घेता येईल. अंगारकी चतुर्थी दिवशी सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. येत्या 2 मार्च 2021 रोजी अंगारकी चतुर्थी आहे. या चतुर्थीला विशेष महत्व आहे. या दिवशी सिद्धिविनायक मंदिरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने शारीरिक दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आधी बुकिंग असणाऱ्या लोकांना सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यानच दर्शन घेता येणार आहे. मात्र एका तासामध्ये नक्की किती लोकांना दर्शन घेता येईल याबाबत प्रशासनाने अजूनतरी माहिती दिली नाही. यापूर्वीच्या नियमांमध्ये एका दिवसात केवळ फक्त एक हजार भाविकांनी दर्शनाची परवानगी होती. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील प्रमुख मैदानांपैकी एक ‘ओव्हल स्टेडियम’ (Oval Maidan) 15 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 26 फेब्रुवारीपासून पुढील 15 दिवस हे मैदान बंद असेल. (हेही वाचा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील Oval Maidan 26 फेब्रुवारीपासून 15 दिवस बंद)
दरम्यान, मुंबईमध्ये काल कोरोनाच्या 1167 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संक्रमितांची संख्या 32,1698 झाली आहे. आज शहरात 376 कोरोना रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 30,10,57 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 8,320 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.