काल मुंबईमध्ये (Mumbai) कोरोना विषाणूच्या (Coronavirus) रुग्णसंख्येने 1 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यातही इतर अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार पुन्हा एकदा कडक उपयोजना अंमलात आणत आहे. मुंबईत पुन्हा एकदा वाढत्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निर्बंधाचा टप्पा सुरू झाला आहे. आता बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनने (BMc) एक महत्वाचा निर्णय घेत मुंबईमधील प्रमुख मैदानांपैकी एक ‘ओव्हल स्टेडियम’ (Oval Maidan) 15 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 26 फेब्रुवारीपासून पुढील 15 दिवस हे मैदान बंद असेल. यासंदर्भात बीएमसीने मुंबई शहरातील डीएम यांना पत्रही पाठविले आहे.
मुंबईच्या चर्चगेट भागात असलेले ओव्हल मैदान हे शहरातील एक प्रसिद्ध मैदान आहे. याठिकाणी मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आणि पालघर या भागातील मुले क्रिकेट खेळण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. यामुळे, मैदानात खूप गर्दी होत आहे व त्यामुळे कोरोना संक्रमणाचा प्रसार होण्याचा धोका वाढत आहे. सध्या मुंबई शहरात दररोज सरासरी 7-8% कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, हे लक्षात घेऊन बीएमसीने ओव्हल मैदान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: वाशिम जिल्ह्यातील एका वसतिगृहातील 190 विद्यार्थ्यांना कोरोना संक्रमण)
BMC to close the iconic Oval Maidan from tomorrow, 26th February due to rise in #COVID19 cases in Mumbai: Chanda Jadhav, BMC Assistant municipal commissioner
— ANI (@ANI) February 25, 2021
ओव्हल मैदान हे दक्षिण मुंबई मध्ये वसलेले एक ग्रेड 1 चे मैदान आहे. हे मैदान अंडाकृती आकाराचे असल्याने त्याना ओव्हल मैदान म्हणतात. या ठिकाणी क्रिकेट आणि फुटबॉल सर्वाधिक खेळले जातात. या मैदानाच्या जमिनीचे क्षेत्रफळ 22 एकर (8.9 हेक्टर) आहे. मैदानावर राजकीय रॅली आणि धार्मिक कार्यक्रमांस बंदी आहे. दरम्यान, मुंबईमध्ये काल कोरोनाच्या 1167 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संक्रमितांची संख्या 32,1698 झाली आहे. आज शहरात 376 कोरोना रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 30,10,57 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 8,320 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.