Andheri East Bypoll 2022: अंधेरी पूर्व पोटनिवडणूक, प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; सायंकाळी 6 पासून आचारसंहिता लागू
Election | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll 2022) रंगलेला सामना आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. पोटनिवडणुकीसाठी लागलेल्या निवडणुकीचा प्रचार आज (1 नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजल्यापासून बंद होणार आहे. प्रचाराचा तोफा थंडावल्यानंतर लगेचच (सायंकाळी 6 वाजता) आदर्श आचारसंहिता (Andheri by-election Code of Conduct ) लागू होणार आहे. त्यामुळे जाहीर प्रचारावर बंदी असणार आहे. तसेच, संपूर्ण मतदारसंघात विविध पातळीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध मतदान पार पडेपर्यंत (पुढचे 48 तास) असणार आहेत. अंधेरी पूर्व मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी सकाली 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान पार पडेल. निवडणुकीसाठी आता केवळ 7 उमेदवार रिंगणात आहेत. सुरुवातीला 'सामना' शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात होणार होता. मात्र, परंपरेचे कारण पुढे करत भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय सोपा झाल्याचे मानले जात आहे. आता ऋतुजा लटके यांच्यासमोर तितके मोठे आव्हान नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्याच विजयी होतील, असे मानले जात आहे. (हेही वाचा, Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन)

आचारसंहता लागू असल्याने मतदारसंघामध्ये निर्बंध कालावधीत मद्यविक्री दुकाने व तत्सम बाबींचे व्यवहार पूर्ण बंद असतील. त्यासंदर्भात केली जाणारी खरेदी-विक्री, देवाणघेवाण यावर पूर्णत: निर्बंध असतील. राजकीय कारणांसाठी धार्मिक स्थळांचा वापर करता येणार नाही. मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात येणारे एकगठ्ठा लघू संदेश (SMS) आणि ध्वनिक्षेपकाचा वापर यांवरही बंधी असेल. जाहीर मिरवणूक, सभा आदींवर पूर्ण निर्बंध असतील. त्या गोष्टी करताच येणार नाहीत. मतदान केंद्रापासून कमीत कमी 200 मिटर परिघाच्या अंतरात उमेदवारांना तत्पुरते कार्यालय, संपर्क ठिकाण उभारता येणार नाही. शिवाय ओपिनीयन पोल, सर्व्हेक्षण आदि बाबींवरही निर्बंध असणार आहेत.