Murji Patel, Rutuja Latke | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीतून (Andheri East Assembly Bypoll) भाजपने माघार घेतली. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुरजी पटेल यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन तर केल. परंतू, पटेलांनी पाळलेला पक्षादेश त्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र पटला नाही. परिणामी कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अनेक कार्यकर्त्यांना तर रडूच कोसळले. ते अक्साबोक्शी रडू लागले. काहींनी पटेलांविरोधता आणि भाजप विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे भाजपचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असला तरी स्थानिक पातळीवर तो कार्यकर्त्यांना फारसा आवडल्याचे चित्र नाही.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे पारडे सुरुवातीपासूनच जड होते. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेनेचे रमेश लटके या ठिकाणहून निवडून आले होते. रमेश लटके यांनी भाजपच्या मूरजी पटेल यांचा सुमारे 16 हजार मतांनी पराभव केला होता. दरम्यान, रमेश लटके यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भरला होता.

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये रमेश लटके विजयी झाले असले तरी, भाजपचे मुरजी पटेल दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे आताची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असे बोलले जात आहे. असे असले तरी एखाद्या आमदाराचे निधन झाले आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली तर ती निवडणूक बिनविरोध करायची असा राज्याच्या राजकारणातील अलिखीत नियम आहे. त्यामुळे हा नियम पाळला जावा अशी इच्छा राज्यातील काही प्रमुख नेत्यांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर पत्रच लिहीले होते. शरद पवार यांनीही तशीच भूमिका व्यक्त केली होती.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे घोषणा केली की, मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजप लढवणार नाही. त्यामुळेत्यांचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) उमेदवारी अर्ज मागे घेतील. भारतीय जनात पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत. राजकीय वर्तुळात चर्चेला विषय मिळाला असला तरी, 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke यांचा विधानसभेवर जाण्याचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे. असे असले तरी अद्यापही 12 उमेदवारांचे अर्ज कायम आहेत. त्यामुळे लटके यांचा विधानसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अद्यापही कमीच आहे.