अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक (Andheri Bypoll 2022) आता काहीच दिवसांचा अवधीआहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण कोण उमेदवार उतरवले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वृत्त येत आहे की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) या उमेदवार असणार आहेत. परंतू, याच ऋतुजा लटके यांना गळाला लावण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे गटाकडून सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शिंदे गटाच्या या कथीत आणि संभाव्य कृतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष हा सत्तेसाठी असूसलेला पक्ष आहे. त्यामुळे काहीही झाले तरी त्यांना सत्ता हवीच असते. तो पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. केवळ त्याच कारणास्तव त्यांनी वाट्टेल ती किंमत मोजली आणि शिवसेना फोडली. शिवसेनेत झालेली बंडाळी ही भाजप प्रणित आहे. आता तर तो प्रयोग अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतही पाहायला मिळते आहे. उद्धव ठाकरे गटाने दिलेला उमेदवार साम-दाम-दंड-भेद वापरुन फोडण्याचे अथवा पळविण्याचे काम सध्या शिंदे गट आणि भाजपाकडून सुरु असल्याचे समजते आहे. अंधेरीत मराठी भाषकांची संख्या मर्यादीत आहे. त्यामुळे तिथे नेमका निकाल काय येतो याबाबत उत्सुकता होती. मात्र, थेट उमेदवारच पळविण्याचे काम सुरु आहे. अशाने पूढच्या निवडणुकीत तेथे भाजप विरोधात कोणीच उमेदवार उभा राहणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या विधानावार शिंदे गटाच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा आहे.
आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. रमेश लटके हे शिवसेना आमदार होते. आता या ठिकाणी याच रमेश लटके यांच्या पत्नीला म्हणजेच ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचे उद्धव ठाकरे गटाने जाहीर केले आहे. दरम्यान, शिंदे गटाने आता ऋतुजा लटके यांनाच थेट आपल्या बाजूला घेऊन उमेदवारी देण्याबाबत प्रयत्न सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी भाजपने उमेदवार देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपचे संभाव्य उमेदवार मुरजी पटेल यांनी प्रचारही सुरु केला आहे. असे असले तरी आयत्या वेळी मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेऊन ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटातून उमेदवारी देण्याचा विचार सुरुअसल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ऋतुजा लटके या स्वत:ही संपर्काबाहेर आहेत. लटके यांचे चिरंजीव पाच दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आले आहे.