Coronavirus Outbreak: मुंबईमध्ये कोरोनाबाधित 80 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू; देशातील मृत्यूचा आकडा 34 वर
Coronavirus cases | (Photo Credits: PTI)

देशात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. भारतात कोरोना विषाणूची सर्वात जास्त लागण झालेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक राज्य आहे. अशात महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे होत असलेल्या मृत्यूमध्ये आज आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची भर पडली. आता महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे दहावा मृत्यू झाला आहे. मुंबईत (Mumbai) कोरोना विषाणूमुळे एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे. सध्या राज्यात एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 216 इतकी झाली आहे.

आज संध्याकाळी मुंबईमधील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एका 80 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूचा खुलासा झाला. त्याला हृदयाशी संबंधित आजार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. यासह, महाराष्ट्रात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण 10 वर पोहोचले आहे. राज्यात संक्रमणामुळे सर्वाधिक मृत्यू मुंबईत झाले असून, आज पुण्यात पहिला मृत्यू झाला. पुण्यातील रुग्णालयात 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही व्यक्ती देखील मधुमेहाचा रुग्ण होता. पुण्यात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेली व्यक्ती पुण्याहून ठाणे असा सतत प्रवास करीत होती. लॉकडाऊन झाल्यावर हा प्रवास थांबला होता. (हेही वाचा: भारतातील लॉकडाउन 4-8 आठवडे वाढल्यास, जवळजवळ 2 कोटी छोटे उद्योग होऊ शकतात बंद; तज्ञांनी दिला इशारा)

सोमवारी सकाळी पुण्यात संसर्गाची पाच प्रकरणे नोंदवली गेली. अशा एकत्रितपणे पुण्यात संक्रमित लोकांची संख्या 37 वर पोहोचली आहे. यातील सात जण बरे झाले आहेत. दरम्यान, मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीन नुसार, देशात कोरोना विषाणूच्या सक्रीय घटनांची संख्या 1024 आहे. यातील 96 लोक एकतर बरे झाले आहेत किंवा त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वाधिक 216 रुग्णांची नोंद झाली असून, यामध्ये 3 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.